‘डीजी’ कॉलेज देशात नंबर १

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सातारा - बंगळूर येथील ‘नॅक’च्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणात येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाने देशात नंबर १ मिळवला असून, रयत शिक्षण संस्था आणि कॉलेजच्या शिरपेचात A + (ए प्लस) चा मानाचा तुरा झळकला आहे. कॉलेजच्या प्रशासनावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या यशाचा आनंद व्यक्त करताना सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

सातारा - बंगळूर येथील ‘नॅक’च्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणात येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाने देशात नंबर १ मिळवला असून, रयत शिक्षण संस्था आणि कॉलेजच्या शिरपेचात A + (ए प्लस) चा मानाचा तुरा झळकला आहे. कॉलेजच्या प्रशासनावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या यशाचा आनंद व्यक्त करताना सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

गुणवत्ता, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भौतिक सुविधा, दर्जेदार शिक्षण, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना दिले जाणारे विविध व्यावसायिक शिक्षण अशा विविध उपक्रमांमुळे गेल्या काही वर्षांत या कॉलेजने राज्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. ‘नॅक’च्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षणात महाविद्यालयाने उत्कृष्ट मानांकन मिळविले होते. उत्कृष्ट शैक्षणिक कार्यामुळे गेल्या दोन वर्षांत महाविद्यालय स्वायत्त झाले आहे. यशाच्या पुढच्या टप्प्याचा वेध घेणाऱ्या या महाविद्यालयाने ‘नॅक’च्या मानांकनात सर्वोत्कृष्ट  ठरण्यासाठी कंबर कसली होती. त्यांना संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, कार्यकारिणी सदस्य संजीव पाटील, इतर पदाधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले. गुणवत्तेच्या सर्व पातळ्यांवर अव्वल होण्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड आणि सर्व प्राध्यापकांनी कसून प्रयत्न केले. बंगळूरच्या नॅक समितीने महाविद्यालयाची गेल्या महिन्यात पाहणी केली होती. काल (ता. १२) बंगळूरमध्ये समितीने पाहणीचा निष्कर्ष जाहीर केला. या थर्ड सायकलमध्ये देशातील ४२ महाविद्यालयांचे परीक्षण करण्यात आले. या महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या तीन प्रकारच्या बीकॉम पदवी, एमकॉमचे दोन विषय, एमफिल पदवी, १४ व्यवसायाभिमुख कोर्सेस, बीसीए पदवी या सर्वांचा कालानुरूप असलेला अभ्यासक्रम, शिकविण्याच्या अत्याधुनिक पद्धती, शिक्षकांचे संशोधन कार्य, विद्यार्थ्यांचा सर्व विभागांतील उत्कृष्ट निकाल, या सर्वांचा आढावा घेऊन नॅक समितीने परीक्षणात महाविद्यालयाला ए प्लस गुणांकन दिले आहे. त्यामध्ये सर्वात जास्त गुणांकन (सीजीपीए ३.६१) धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाने मिळविले आणि स्वतंत्र वाणिज्य कॉलेज असलेले हे महाविद्यालय देशात अव्वल ठरले. सर्व स्वायत्त महाविद्यालयांत हे गुणांकन सर्वाधिक आहे. याबाबतचे वृत्त कळताच महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला, तसेच प्राचार्यांसह प्राध्यापक आणि सेवकांसह कर्मचाऱ्यांवर राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. विजय सावंत, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, माजी प्राचार्य शहाजी डोंगरे, तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, माजी विद्यार्थी, माजी प्राचार्य एम. ए. शेख यांनी प्राचार्या गायकवाड आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

महाविद्यालयाला मिळालेल्या या यशाचा आम्हाला अभिमान आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी, आजी- माजी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी आणि समस्त सातारकरांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे यश मिळाले आहे. यशाची पुढची शिखरे गाठण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहे.
डॉ. प्रतिभा गायकवाड, प्राचार्या

Web Title: satara news Dhananjayrao Gadgil Commerce College