डॉक्‍टर, सुविधांअभावी आरोग्यसेवा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

वाई तालुक्यातील स्थिती; शासनाच्या अनास्थेमुळे बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट 

वाई तालुक्यातील स्थिती; शासनाच्या अनास्थेमुळे बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट 

वाई - वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांची रिक्त पदे आणि पुरेशा सुविधांचा अभाव यामुळे वाई तालुक्‍यात ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्यसेवा विस्कळित झाली आहे. उपलब्ध मनुष्य बळावर शासनाच्या विविध आरोग्यसेवा पुरविताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण पडतो. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. तालुक्‍यात तीन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाली आहेत; परंतु जागा उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे प्रस्ताव रखडले आहेत. शासनाच्या अनास्थेमुळे ग्रामीण भागात बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट वाढत असल्याचे चित्र दिसून येते.      

तालुक्‍यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व २८ उपकेंद्रे आहेत. त्यापैकी मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्र व मुगाव उपकेंद्रासाठी इमारत नाही. भुईंज, कवठे व मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोनपैकी एक पद रिक्त आहे. याशिवाय विविध उपकेंद्रांत आरोग्य सहायक, आरोग्य सेवक- सेविका व शिपाई अशी आठ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांना ग्रामीण भागात आरोग्य सेवा, तसेच शासनाच्या विविध योजना सामान्य रुग्णांपर्यंत पोचविताना पुरेपूर दमछाक होताना दिसते. 

तालुक्‍यात बोपर्डी, वेलंग, उडतरे ही तीन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत. वनविभागाने जमीन उपलब्ध करून दिल्याने बोपर्डी केंद्राचा प्रस्ताव मार्गी लागला आहे. वेलंग व उडतरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रस्ताव मात्र जागेअभावी रखडले आहेत. आकोशी येथील आयुर्वेदिक दवाखान्यात डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने बंद आहे. त्याठिकाणी आठवड्यातून एक दिवस डॉक्‍टर ‘ओपीडी’साठी जातात. केंजळ येथील आरोग्य पथकाचे काम बंद आहे.

पुणे- बंगळूर महामार्गालगत असलेल्या भुईंज व कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पद रिक्त असून, त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर ताण येतो, तसेच महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे याठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी एमबीबीएस डॉक्‍टर उपलब्ध करण्याची खरी गरज आहे. काही वर्षांपूर्वी मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी सुमारे ११ लाख रुपये खर्च करण्यात आले; परंतु त्यानंतर जागेचा वाद उपस्थित झाल्याने इमारतीचे काम अर्धवट राहिले. या आरोग्य केंद्राला इमारत नसल्याने तालुक्‍याच्या पश्‍चिम आणि दुर्गम भागातील रुग्णांना आरोग्यसेवा पुरविताना आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रचंड दमछाक होते.

वाई तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील दुर्गम ओहळी गावात मागील महिन्यात चिकुनगुनियाचे ३० रुग्ण आढळले, तर सोनगीरवाडीत एक स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला होता. ओहळीतील चिकुनगुनियाची साथ आज आटोक्‍यात आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे पावसाळ्यात साथीच्या रोगांना आटोक्‍यात आणणे कठीण जाणार आहे.
- डॉ. संदीप यादव, वैद्यकीय अधिकारी, वाई.

Web Title: satara news doctro facility health service disturb