डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्काराचा विसर

डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्काराचा विसर

सातारा - अनिष्ट रूढी आणि परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधनाचे हत्यार उपसणारे विवेकवादी ज्येष्ठ कार्यकर्ते, संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या सामाजिक पुरस्काराचा विसर सातारा नगरपालिकेला पडला आहे. डॉ. दाभोलकर यांचा जन्मदिन समाजोपयोगी उपक्रमांनी नुकताच साजरा झाला. पण, अद्याप या पुरस्काराची निवड करणाऱ्या समितीची एकही बैठक यंदा झालेली नाही. 

डॉ. दाभोलकर यांचा ता. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात खून झाला. साताऱ्यातून आपल्या कामाची सुरवात करणाऱ्या डॉक्‍टरांच्या स्मृती जपल्या जाव्यात, प्रवाहाविरूद्ध चालणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ मिळावे, या हेतूने महाराष्ट्र मराठी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने सातारा पालिकेपुढे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक पुरस्काराचा प्रस्ताव ठेवला होता. तत्कालीन उपाध्यक्ष अमोल मोहिते यांनी या प्रस्तावाला मूर्त स्वरूप दिले. तत्कालीन विरोधी पक्षनेते ॲड. बाळासाहेब बाबर, सातारा विकास आघाडीचे तत्कालीन प्रतोद ॲड. दत्ता बनकर, ‘नगरविकास’चे अविनाश कदम यांनी एकत्र येऊन एकमताने या प्रस्तावाला मान्यता दिली. २०१३ मध्ये डॉ. अभय व रानी बंग यांना पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे (२०१४), ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर (२०१५), डॉ. रघुनाथ माशेलकर (२०१६) यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराच्या निमित्ताने या ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्यांना जवळून जाणण्याची संधी सातारकरांना मिळाली. या पुरस्कारामुळे सामाजिक कार्यकर्त्यांचा व त्यांच्यामुळे पुरस्काराला वेगळी सामाजिक उंची व प्रतिष्ठा मिळाली. या पुरस्काराने सन्मानित बहुतेक मान्यवरांनी पुरस्काराचा एक लाख रुपयांचा निधी हा सामाजिक कार्यासाठी दिला, हे या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल.

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, विरोधी पक्ष नेते व साहित्य-सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी हे पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत. या समितीची बैठक बोलवावी, म्हणून नगरविकास आघाडीचे प्रतोद अमोल मोहिते यांनी पालिकेला स्मरणपत्र दिले. नगरसेविका सुजाता राजेमहाडिक यांनीही अनेकदा या विषयाकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. मात्र, अद्याप पालिका पदाधिकाऱ्यांना बैठक बोलावून निर्णय घ्यायला वेळ मिळाला नाही. पदाधिकाऱ्यांनी गांभीर्य ओळखून पावले न उचलल्यास पालिकेच्या अनेक चांगल्या पण अस्ताला गेलेल्या उपक्रमांमध्ये या पुरस्काराची भर पडण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

पुरस्काराच्या घोषणेसाठी विलंब झालाय, हे मान्य. काही कारणाने मागे पडलेले काम सुरू केले आहे. लवकरच यंदाच्या पुरस्काराची घोषणा होईल.
- माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com