ड्रायव्हिंग लायसन्स देणे आता काही काळ बंद

ड्रायव्हिंग लायसन्स देणे आता काही काळ बंद

सातारा - नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील वाहन चार या सॉफ्टवेअरच्या अंमलबजावणीनंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये परवाना देण्याच्या सॉफ्टवेअरमध्येही सारथी चार प्रणालीचा बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांना जास्तीतजास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. या प्रणालीच्या कामासाठी काही काळ परवाना देण्याचे काम बंद राहणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाच्या नोंदणी प्रक्रियेसाठी वाहन प्रणालीचा वापर केला जातो. दोन महिन्यांपूर्वी या प्रणालीमध्ये वाहन एकवरून वाहन चार हा बदल करण्यात आला. त्यामुळे नोंदणीतील सर्व प्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन झाली. वाहन विक्री करणाऱ्या डीलर्ससाठीही ऑनलाइन सुविधा निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे परवाने देण्याच्या प्रक्रियेतही सुधारणा करण्यात येत आहेत. सध्या परवान्यासाठी सारथी- एक ही प्रणाली वापरली जाते. या प्रणालीमध्ये असणाऱ्या त्रुटीतील सुधारणा, आणखी जास्त सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी या प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत. सारथी - चार या नावाने ही प्राणाली तयार करण्यात आली आहे.

सध्याच्या प्रणालीमध्ये लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन नोंदणी करता येते. मात्र, कागदपत्रे प्रत्यक्ष कार्यालयातच द्यावी लागतात. नव्या प्रणालीमध्ये आवश्‍यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अर्जासोबत अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे झेरॉक्‍सचा त्रास व खर्च वाचणार आहे. मात्र, मिळालेल्या तारखेला अर्जदाराला आपली मूळ कागदपत्रे दाखविण्यासाठी घेऊन जावी लागणार आहेत. परवान्याचे नूतनीकरण व डुप्लिकेट परवान्यासाठीही अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर पक्‍या लायसन्ससाठीही ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. 

नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी सध्या प्रणालीमध्ये असलेली सर्व माहिती नवीन प्रणालीमध्ये भरावी लागणार आहे. ही सुविधा पुण्यात आहे. त्यामुळे सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व माहिती पुण्याला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे काही काळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परवान्याचे काम बंद राहणार आहे.

सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शिल्लक असणारे परवान्यांचे काम संपवण्याची लगबग सुरू आहे. आठ दिवसांत हे काम पूर्ण करावयाचे आहे. त्यामुळे ज्यांची नवीन परवाना, नूतनीकरण व डुप्लिकेट परवान्याची कामे शिल्लक असतील त्यांनी तातडीने ती पूर्ण करून घ्यावीत.’’ 
- संजय धायगुडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com