ग्रहण न पाळणे नव्हे, पाळणे ही विषाची परीक्षा! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सातारा - सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आले की काळजाचा ठोका चुकतो, तो गरोदर मातांचा. भाजी चिरली की गर्भाचे ओठ फाटणार, बोटे जुळविली तर गर्भाची बोटे जुळणार, पापण्या मिटविल्या तर डोळ्यात व्यंग येणार... अशा अनेक अंधश्रद्धांचे काहूर माजते. पण, आता ही भीती सोडा. कारण, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रोटरी क्‍लब वाई यांसह स्त्रीरोग तज्ज्ञ आता याविषयी जनजागृती करू लागले आहेत. 

सातारा - सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आले की काळजाचा ठोका चुकतो, तो गरोदर मातांचा. भाजी चिरली की गर्भाचे ओठ फाटणार, बोटे जुळविली तर गर्भाची बोटे जुळणार, पापण्या मिटविल्या तर डोळ्यात व्यंग येणार... अशा अनेक अंधश्रद्धांचे काहूर माजते. पण, आता ही भीती सोडा. कारण, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रोटरी क्‍लब वाई यांसह स्त्रीरोग तज्ज्ञ आता याविषयी जनजागृती करू लागले आहेत. 

ग्रहण न पाळणे ही विषाची परीक्षा नसून, ग्रहण पाळणे हिच विषाची परीक्षा आहे. परंतु, वर्षांनुवर्षे सूर्यग्रहण व चंद्रग्रहणांविषयी असलेल्या गैरसमजुतीतून ते आजही कडक पाळले जाते. विशेषत: गरोदर माता ग्रहण पाळत असतात. त्यांनी ग्रहण पाळावे यासाठी वडीलधारीही आग्रही असतात. वर्षातून चार तर कधी कधी सात वेळा ग्रहणाची स्थिती येते. त्यामुळे प्रत्येक गरोदर मातेला एकदा तरी ग्रहणातून पुढे जावे लागते. वेध लागल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत ते पाळले जाते. मग, त्यात झोपायचे नाही, अन्न वर्ज्य, बोटे कशीही वळवायची नाहीत, कोणतेही काम करायचे नाही, अशा प्रकारे ग्रहण पाळले जाते. कारण, आपल्या छोट्याशा जिवाला आपल्या चुकीची शिक्षा होणार, ही भीती असते. त्यामुळे आकाशातील ग्रहांचे, सावल्यांचे खेळ संपेपर्यंत गरोदर मातेने जीव मुठीत धरून बसावे. वास्तविकता बाळाची रचना तिसऱ्या महिन्याअखेर व्यवस्थित दिसत असते. त्यामुळे तिसऱ्या महिन्यानंतर ग्रहण पाळणे संयुक्‍तिकही ठरत नसते. ग्रहणाविषयीची गरोदर मातांमधील अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि रोटरी क्‍लब वाईतर्फे सध्या वाई तालुक्‍यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व स्त्रीरोग रुग्णालयांत जनजागृती करत आहेत. ठिकठिकाणी जाहिरात फलकही लावण्यात आले असून, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांसाठी मार्गदर्शनही केले जात आहे. शेवटी अंधश्रद्धेचे ग्रहण सोडणे की, त्याला धरून बसणे, ज्याच्या त्याच्यावरच अवलंबून असणार आहे. 

स्वरूप व्हावे व्यापक  
जिल्ह्यात सुमारे 200 हून अधिक स्त्रीरोग तज्ज्ञ असून, बहुतांश तज्ज्ञांची रुग्णालये आहेत. तसेच दोन उपजिल्हा रुग्णालये, 15 ग्रामीण रुग्णालये, 72 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 400 आरोग्य उपकेंद्रे आहेत. तेथेही ही मोहीम व्यापक स्वरूपात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. सातारा स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर कटारिया यांनी लवकरच व्यापक पध्दतीने याबाबत जनजागृती केली जाईल, असे सांगितले. 

ग्रहण पाळण्याचे तोटे  
गर्भवतीला आणि गर्भाला भूक सहन होत नाही. जास्त वेळ उपवास केल्याने रक्‍तातील साखर उतरते, चक्‍कर येते, थकवा येतो. अचानक साखर उतरणे आणि पुन्हा खाल्ल्यानंतर साखर वाढणे हा चढ-उतार गर्भाला सहन होत नाही. एका जागी बसून रक्‍ताचा पुरवठा मंदावतो. रक्‍ताचा वेग मंदावला तर त्याच्या गुठळ्या होतात. काही वेळा ते धोकादायक ठरू शकते. पाणी वर्ज्य केल्याने लघवी कमी होऊन मूत्रमार्गाचे इन्फेक्‍शन होऊ शकते. 

""पूर्ण दिवसांचे बाळ असेल तर 96 टक्‍के ते चांगले जन्माला येते. सुमारे चार टक्‍के बाळांमध्येच व्यंग असतात. ग्रहण पाळणे ही अंधश्रद्धा आहे. त्याचे अनेक तोटे असून, ते बाळ आणि गरोदर मातेसाठी धोकादायक ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे थांबावे, यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत.'' 
-डॉ. शंतनू अभ्यंकर, स्त्रीरोग तज्ज्ञ, वाई

Web Title: satara news Eclipse Pregnant women Superstition