"प्रगत शैक्षणिक'साठी सातारा पायलट! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

सातारा - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत नवीन शैक्षणिक सत्रापासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानुसार चाचणी घेतली जाणार आहे. पाचवी ते आठवीपर्यंतचे 100 टक्‍के विद्यार्थी 75 टक्‍क्‍यांपेक्षा हुशार व्हावेत, यासाठी राज्यातून सातारा तालुक्‍याची पायलट प्रोजेक्‍ट म्हणून निवड केली आहे. 

सातारा - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत नवीन शैक्षणिक सत्रापासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानुसार चाचणी घेतली जाणार आहे. पाचवी ते आठवीपर्यंतचे 100 टक्‍के विद्यार्थी 75 टक्‍क्‍यांपेक्षा हुशार व्हावेत, यासाठी राज्यातून सातारा तालुक्‍याची पायलट प्रोजेक्‍ट म्हणून निवड केली आहे. 

"असर'चा शैक्षणिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर, शासकीय पातळीवर राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली असता धक्‍कादायक वास्तव समोर आले. तिसरीनंतर पाचवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळलेली, त्यापेक्षाही इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक ढासळून आलेली दिसून आली. आठवीमधील विद्यार्थ्यांची विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्र व गणित विषयांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये गणिती क्रियांमध्ये भागाकार सोडविणे अवघ्या 52 टक्‍केच विद्यार्थ्यांना जमत असल्याचे पुढे आले. हे वास्तव शिक्षण विभागाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले. 

त्याची दखल घेत शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी सातारा येथे राज्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली होती. त्यामध्ये पाचवी ते आठवीपर्यंतच्या 100 टक्‍के विद्यार्थ्यांना सर्व विषयांत 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजेत, यासाठी कृतीआराखडा तयार करून अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा जिल्ह्यात तज्ज्ञ शिक्षक व विषयानुरूप शिक्षकांची कार्यशाळा घेऊन कृतीआराखडा बनवून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. 

आठवीतील सर्व विद्यार्थी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीत 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळावेत, यासाठी सातारा तालुक्‍याची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड केली आहे. यासाठी सातारा तालुक्‍यातील सर्व माध्यमांच्या 484 शाळांमध्ये भागाकार, गुणाकार या गणिती क्रियांवर भर दिला जात आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीच्या धर्तीवर तीन टप्प्यांत चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी दिली. 

...अशी होणार चाचणी  
शैक्षणिक सत्र सुरू होताच पहिलीच अध्ययन चाचणी घेण्यात येईल. त्यात एका तुकडीतील विद्यार्थ्यांना भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकीचे गणित सोडविण्यासाठी दिले जाईल. त्यातील जे विद्यार्थी कमकुवत निघाले, अशांना विशेष पथकाद्वारे समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात येईल. 15 सप्टेंबरपर्यंत तीन चाचण्या घेतल्या जातील. 

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 

चाचणीत जिल्ह्याची कामगिरी 

इयत्ता......परिसर अभ्यास.....रॅंक........भाषा.........रॅंक..........गणित..........रॅंक 
तिसरी.......80.32.........3.........79.52.....3............74.46.......3 
पाचवी.......60.33..........7.........68.18......4...........55.88.......11 

इयत्ता.........विज्ञान.....रॅंक........भाषा.........रॅंक..........गणित..........रॅंक.....सामाजिक शास्त्र.....रॅंक 
आठवी......40.66....16.......71.41.....2..........41.56.......13...........45.08.........8 
(टीप : इयत्तानिहाय विषयांतील सरासरी गुण आणि राज्यातील रॅंक)

Web Title: satara news education