मायणी बाजारपेठेला अतिक्रमणांचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मायणी - येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विकसित झालेल्या बाजारपेठेला अतिक्रमणांचा फटका बसू लागला आहे. खासगी मालक, व्यावसायिकांकडून होणारे अतिक्रमण व रस्त्यावर दुतर्फा उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे रस्ते अरुंद होऊ लागले आहेत. वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिक, प्रवासी आणि उपनगरांतील रहिवासी त्या मुख्य बाजारपेठेकडे पाठ फिरवू लागले आहेत. कातरखटावला जशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली तद्वत नव्या दमाचे नवे कारभारी काही ठोस निर्णय घेणार का? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. 

मायणी - येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विकसित झालेल्या बाजारपेठेला अतिक्रमणांचा फटका बसू लागला आहे. खासगी मालक, व्यावसायिकांकडून होणारे अतिक्रमण व रस्त्यावर दुतर्फा उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे रस्ते अरुंद होऊ लागले आहेत. वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिक, प्रवासी आणि उपनगरांतील रहिवासी त्या मुख्य बाजारपेठेकडे पाठ फिरवू लागले आहेत. कातरखटावला जशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली तद्वत नव्या दमाचे नवे कारभारी काही ठोस निर्णय घेणार का? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. 

खटाव तालुक्‍यातील मुख्य बाजारपेठेचे गाव म्हणून मायणीकडे पाहिले जाते. शैक्षणिक केंद्र, राजकीय घडामोडी, पर्यटन केंद्र म्हणून गावाचा लौकिक सर्वदूर पोचला आहे. त्यामुळे गावाची वाढ व विस्तार झपाट्याने होत आहे. परिणामी येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व चांदणी चौकात बाजारपेठही विस्तारू लागली आहे. उपनगरांतही दुकाने उभी राहू लागली आहेत. गावातून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर रोडवर अनेक खासगी मालकांनी अतिक्रमणे केली आहेत. रस्त्याच्या बाजूकडे दुकाने, ओसरी, कट्टे वाढवले आहेत. त्यामुळे रस्त्यांची मूळ रुंदी कमी झाली आहे. त्यातच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत वारेमाप वाढ झालेली आहे. परिसरातील सुमारे 20 गावांतील लोक येथील बाजारपेठेत येतात. वाहनांना पार्किंगची सोय नसल्याने जागा मिळेल तेथे वाहने उभी कऱण्यात येतात. खासगी वाहतूक कऱणारी वाहनेही रस्त्यावर उभी असतात. लांब पल्ल्याच्या बस गाड्याही येथील मध्यवर्ती बस स्थानकात ये-जा करतात. एसटीच्या सुमारे दीडशे फेऱ्या येथून होत असतात. त्यामुळे रस्त्यावर सतत वर्दळ असते. आठवडी बाजारादिवशी तर वाहतुकीची कोंडी ठरलेलीच असते. तशी ती दररोजच कमी अधिक प्रमाणात होत असते. वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीला कंटाळून 

विटा आगाराने तर गाड्या गावातील बस स्थानकात न आणता चांदणी चौकातूनच परत नेल्या जातील अशा आशयाचे लेखी पत्रच ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल असल्याचे स्पष्ट होते. 

गावातील मुख्य रस्त्याला कोंडी होऊ नये, यासाठी गावाकडेने चांद नदीला समांतर बायपास रस्ता काढण्यात आलेला आहे. मात्र, त्यावर अद्याप खडीकरणही करण्यात आलेले नाही. तरीही अनेक मोठी, अवजड वाहने बायपासने जातात. तद्वत प्रवासी वाहने, पर्यटक, परिसरातील गावोगावचे नागरिकही त्याच बायपास मार्गाचा वापर करू लागले आहेत. गावातील मुख्य बाजारपेठेत जाण्याऐवजी चांदणी चौक व अन्यत्र असलेल्या दुकानांतून मालाची खरेदी करू लागले आहेत. त्याचा मुख्य बाजारपेठेतील व्यवहारावर अनिष्ट परिणाम होऊ लागला आहे. बाजारपेठेत ग्राहकांची वानवा निदर्शनास येत आहे. गावातील रस्ते विविध कारणांनी अरुंद होऊ लागल्यामुळे दळणवळणावर परिणाम होत आहे. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेले प्रवासी व वाहनचालक रस्त्याच्या बाबतीत अनेकदा कुचेष्टा करीत असतात. कसले हे गाव, रस्ता किती लहान, खरे तर गावात गाड्या न्यायलाच नकोत, अशा विविध प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. 

लोकांना विश्‍वासात घेऊन अतिक्रमणे निघणार?  
मायणीतील कोंडीवर उपाययोजना म्हणून कातरखटाव ग्रामपंचायतीने लोकांना विश्वासात घेऊन मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे जशी हटवली, त्या धर्तीवर मायणीतील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम नवे कारभारी हाती घेतील का? असा सवाल नागरिक करत आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या नव्या दमाच्या कारभाऱ्यांना नागरिकांकडून जरूर सहकार्य मिळेल, अशी ग्वाहीही मिळत आहे.

Web Title: satara news encroachment mayani market