प्रोत्साहनाची रक्कम जमा असूनही मिळेना!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

सातारा जिल्ह्यातील ३९ हजार ३३८ शेतकऱ्यांच्या बचत खात्यांत ६१ कोटी ८४ लाख २६ हजार ७२ इतकी रक्कम जमा करण्यात आली. पैसे काढू न देण्याबाबत कोणत्याही सूचना आम्ही दिलेल्या नाहीत. 
- डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक, सातारा

सातारा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून अजूनही शेतकऱ्यांना ‘प्रोत्साहन’ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले प्रोत्साहन अनुदानाची रक्कम काढता येत नसल्याने शेतकऱ्यांच्यात कर्जमाफी योजनेविषयी दिवसेंदिवस नाराजी वाढू लागली आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी शासनाने गाजावाजा करत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सक्ती करत शेतकऱ्यांना शेतातील कामधंदा सोडून ओळीत उभे करण्यात आले. योजनेतील निकषांत वारंवार बदल केल्याने शेतकऱ्यांच्यात सातत्याने अस्वस्थता ठेवण्यात आली. या सर्व दिव्यांनंतर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १८१ कोटी २९ लाख रुपये जमा करण्यात आले. यामध्ये २६ हजार २६४ रुपये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. तसेच ३९ हजार ३३८ शेतकऱ्यांच्या खात्यात ६१ कोटी ८४ लाख २६ हजार ७२ इतकी रक्कम जमा करण्यात आली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. पोटाला चिमटा काढून, इतरांकडून व्याजाने पैसे भरून कर्ज भरले असताना शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केले असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यातच २५ टक्के किंवा २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना कमीत कमी मिळेल, यांची दक्षता घेतली आहे. ऑनलाइन यादीत नावे आल्याने अनेक शेतकऱ्यांनी ही रक्कम आपल्या पासबुकावर भरून आणली आहे. मात्र, ही रक्कम काढण्यासाठी गेल्यावर जिल्हा बॅंकेच्या अनेक शाखांतून हे पैसे काढता येत नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. हे पैसे काढता येत नसतील तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके तसेच ऊस लागवड केली जात असल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज भासत आहे. प्रोत्साहन अनुदान मिळेल यामुळे रब्बी कर्ज घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे.

कर्जमाफी योजनेची सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे. प्रोत्साहन अनुदानाची रक्कम सुरवातीला काढू देण्यात आली. सध्या मात्र शेतकऱ्यांना पैसे काढू दिले जात नाहीत. तसेच एटीएमवर पैसे निघत नाहीत. या प्रकाराचा बळिराजा शेतकरी संघटना निषेध करत आहे.
- पंजाबराव पाटील, केंद्रीय अध्यक्ष, बळिराजा शेतकरी संघटना
 
कर्ज नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले असून, मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या सर्व शाखांना सूचना दिल्या आहेत.
- डॉ. राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक

Web Title: satara news farmer allowance