आगीचे रौद्ररूप 

आगीचे रौद्ररूप 

सातारा - वर्येनजीक (ता. सातारा) श्रीरंग मंडप डेकोरेटर्सच्या गोदामास दुपारी चारच्या सुमारास लागलेल्या आगीत सुमारे एक कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुमारे 14 टॅंकरच्या साह्याने अडीच तास अनेकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्‍यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

साताऱ्यातील रमेश साळुंखे यांचे श्रीरंग मंडप डेकोरेटर्सचे गोदाम वर्येनजीक आहे. या गोदामात बांबू, सजावटीच्या साहित्य, मॅट, फायबरचे सेट, सोफा सेट, कुशनच्या खुर्च्या, पडदे, कनाती, प्लायवूड आदी मोठ्या प्रमाणात साहित्य होते. 

दुपारी चारच्या सुमारास गोदामाच्या पाठीमागच्या बाजूस काही तरी पेटल्याचे सुरक्षारक्षकास दिसले. त्याने पाहणी केली असता साहित्याने पेट घेतल्याचे त्याला आढळले. त्याने तातडीने पाण्याच्या बादल्या आणून पेट घेत असलेल्या साहित्यावर मारल्या; परंतु तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात धुमसली. आगीचे माहिती मालकास दिली. तोपर्यंत काहींनी पालिकेच्या अग्निशमन विभागास कळविले. अग्निशमनचे वाहन अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोचले आणि आग विझवण्यास प्रारंभ केला. गोदामाच्या चुहूबाजूने आग पसरल्याने धुराचे लोट हवेत दिसू लागले. शहरातील बहुतांश पेठांमधून युवा कार्यकर्ते घटनास्थळी पोचले. त्यांनी पत्रे, बांबू, खुर्च्या बाजूला काढण्यास प्रारंभ केला. तरीही आग आटोक्‍यात येत नसल्याने पालिकेसह अजिंक्‍यतारा कारखाना, कूपर उद्योग समूहाबरोबरच शहरातील अनेक खासगी टॅंकर व्यावसायिकांनी त्यांच्या गाड्या घटनास्थळी आणल्या. सुमारे 14 टॅंकरने अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्‍यात आणली. आग विझवण्यासाठी नगरसेवक विशाल जाधव, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रकाश टोपे, प्रशांत पिलावरे, भरत मुनोत, परब शहा, प्रदीप निकम, राजेंद्र राजापुरे यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्ते आग विझविण्यासाठी धडपड केली. 

आग विझवत असताना साळुंखे कुटुंबातील महिला, मुले यांचा अधूनमधून बांध फुटत होता. "आमचे सर्व संपले आता. आम्ही काय करणार,' असे प्रश्‍न उपस्थित करून ज्येष्ठ महिलांनी हंबरडा फोडला. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे, पालिकेचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक किशोर शिंदे, चंद्रशेखर घोडके, राम हादगे यांच्यासह अनेकांनी साळुंखे कुटुंबीयांना धीर दिला. 

नवा सेट भस्मसात 
आगीत नव्याने खरेदी केलेला सुमारे 12 लाखांचा नवा सजावटीचा सेट भस्मसात झाला. या सेटचे उद्‌घाटन 28 जानेवारीला होणार होते. हा सेट जळाल्याचे पाहून ईश्‍वर, हरिदास तसेच रमेश साळुंखे यांना रडू कोसळले. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी या गोदामात असणाऱ्या सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com