‘एमआयडीसीं’त अग्निशामक सेंटर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सातारा - जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षिततेसाठी नव्या वर्षात चार वसाहतींत अग्निशामक दल उभारण्याचे काम होणार आहे. यासाठीचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळाने शासनाकडे पाठविला आहे. तो मंजूर होऊन आता निविदा प्रक्रियेपर्यंत आला आहे. त्यामुळे सातारा, केसुर्डी, खंडाळा व कऱ्हाड येथे अग्निशामक सेंटर उभारले जाणार आहे. 

सातारा - जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षिततेसाठी नव्या वर्षात चार वसाहतींत अग्निशामक दल उभारण्याचे काम होणार आहे. यासाठीचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळाने शासनाकडे पाठविला आहे. तो मंजूर होऊन आता निविदा प्रक्रियेपर्यंत आला आहे. त्यामुळे सातारा, केसुर्डी, खंडाळा व कऱ्हाड येथे अग्निशामक सेंटर उभारले जाणार आहे. 

जिल्ह्यात सात औद्योगिक वसाहती असून, नव्याने केसुर्डी टप्पा एक, दोन आणि तीनमध्ये उद्योग उभारणीचे काम सुरू आहे. औद्योगिक वसाहती जुन्या झाल्या. परंतु, तेथील एखाद्या कंपनीस वा परिसरात कोठेही आग लागल्यास कंपनीची वैयक्तिक अग्निशामक यंत्रणा वगळता औद्योगिक वसाहतींसाठी स्वतंत्र कोठेच अग्निशामक सेंटर नाही. यामुळे औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांना साखर कारखाने किंवा शहरांतील पालिकांकडील अग्निशामकावर अवलंबून राहावे लागत होते. औद्योगिक वसाहतींत एखाद्या ठिकाणी आग लागल्यास पालिकांचे अग्निबंब पोचण्यास वेळ लागत असल्याने आग नियंत्रणात आणणे आणि त्यातून नुकसान टाळणे यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. पण, नव्या वर्षात उद्योजकांना अग्निशामक यंत्रणा बाहेरून मागविण्याची आवश्‍यकता पडणार नाही.

औद्योगिक विकास महामंडळ जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींत स्वतंत्र अग्निशामक केंद्र उभारणार आहे. त्यामध्ये सातारा, खंडाळा, केसुर्डी आणि कऱ्हाड औद्योगिक वसाहतींचा समावेश आहे. साताऱ्यात नवीन व जुनी अशा दोन वसाहती असून, तेथील कंपन्यांकडे त्यांची स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आहे. पण, आग मोठी असेल तर सातारा पालिकेकडून बंब मागवावा लागतो. तर खंडाळा व केसुर्डीत मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत. 

तेथेही स्वतंत्र अग्निशामक केंद्र आवश्‍यक आहे. कऱ्हाडमध्येही अग्निशामक यंत्रणा नाही. तेथेही अचानक आग लागल्यास पालिका आणि साखर कारखान्यांचे बंब मागवावे लागतात. यातून मार्ग काढून नवीन वर्षात औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षिततेसाठी चार ठिकाणी अग्निशामक केंद्रे होणार आहेत. त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने शासनाकडे दिलेला प्रस्ताव मंजूर झाला असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन केंद्र उभारण्याची कामे सुरू होणार आहेत. हे काम औद्योगिक सुरक्षा विभाग पुणे यांच्याकडे आहे.

Web Title: satara news fire brigade center in midc