बाजारात खणाणणारच पाच, दहाची नाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

सातारा - सध्या चलनात असणारी पन्नास पैशांपासून पाच आणि दहा रुपयांपर्यंतची सर्वच नाणी बाजारात खणाणणार आहेत. व्यापारी आणि बॅंकांनी अशी नाणी स्वीकारावीत, अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेकडून देण्यात आल्या आहेत. तरीही सातारा जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात ग्राहकांकडून नाणी स्वीकारण्यास होणारी टाळाटाळ चुकीची असल्याचे मत वित्तीय संस्थांनी व्यक्‍त केले आहे. 

सातारा - सध्या चलनात असणारी पन्नास पैशांपासून पाच आणि दहा रुपयांपर्यंतची सर्वच नाणी बाजारात खणाणणार आहेत. व्यापारी आणि बॅंकांनी अशी नाणी स्वीकारावीत, अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेकडून देण्यात आल्या आहेत. तरीही सातारा जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात ग्राहकांकडून नाणी स्वीकारण्यास होणारी टाळाटाळ चुकीची असल्याचे मत वित्तीय संस्थांनी व्यक्‍त केले आहे. 

दहा रुपयांचे नाणे बंद होणार असल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नोटाबंदीप्रमाणे सैरभैर झालेले व्यापारी पुन्हा एकदा अस्वस्थ झाले. परंतु, हा संदेश अधिकृत की चुकीचा, याचा विचारच झाला नाही. त्यामुळेच बाजारपेठांमध्ये अशी नाणी स्वीकारण्याबाबत नाके मुरडली जाऊ लागली. काही ठिकाणी तर वादाचेही प्रसंग निर्माण झाले. तर दहा रुपयांचे नाणे खिशात नकोच, अशी भावना नागरिकांची झाली. पण, भारतीय रिझर्व्ह बॅंकेने अशा प्रकारचे कोणतेही निर्देश अद्याप दिलेले नाहीत. 

छोट्या छोट्या वस्तू खरेदी करताना सर्रास दहा रुपयांचे नाणे देण्यावर नागरिकांचा भर असतो. भाजी मंडई, दूध विक्रेते, फुले विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठीही ते सोयीस्कर असते. पण, बाजारपेठेत सध्या निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणामुळे ग्राहकांकडून जरी १० रुपयांचे नाणे स्वीकारले तरी दुसरा ग्राहक घेताना का कू करीत असल्याने छोट्या व्यावसायिकांची अडचण होऊ लागली आहे. परिणामी हे व्यावसायिक दहा रुपयांची नाणी बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी धाव घेताहेत. बहुतांश बॅंका नाणी स्वीकारत असल्या तरी काही बॅंकांमध्ये नाणी घेतल्यानंतर पुढच्या वेळी एवढी (मोठ्या संख्येने) नाणी आणू नका, असा सल्ला दिला जात आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम दैनंदिन चलनावरही होऊ लागला आहे. 

निव्वळ अफवा...
दहा रुपयांचे नाणे बंद होणार असल्याचा संदेश म्हणजे निव्वळ ‘अफवा’ आहे. पण, या संदेशामुळे बॅंकांमध्ये नागरिक नाण्यांचा भरणा करू लागले आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) यासंबंधी कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. अजूनही सर्व प्रकारची नाणी चलनात आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे स्टेट बॅंकेतील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: satara news five, ten rupees coin in market