लक्ष्मी टेकडीवरील घरकुलांना नतद्रष्टांची नजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

दारे, सळया, नळ काढणे, स्लॅब फोडण्याचे प्रकार; ३५० कुटुंबे अद्यापही उघड्यावर

दारे, सळया, नळ काढणे, स्लॅब फोडण्याचे प्रकार; ३५० कुटुंबे अद्यापही उघड्यावर

सातारा - एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत (आयएचएसडीपी) सदरबझारमध्ये उभारण्यात येत असलेल्या गरिबांच्या घरकुलांना लक्ष्मी टेकडीवरील काही नतद्रष्टांची नजर लागली आहे. दारे तोड, बांधकामातून सळया काढून ने, नळांचे कॉक काढ, स्लॉब फोड असले प्रकार सुरू आहेत. यालाही प्रशासन बधत नाही म्हटल्यानंतर झोपडपट्टीतील महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवत त्यांच्यात या संकुलाबाबत अफवा पसरवण्यास सुरवात केली आहे. या नतद्रष्टांच्या प्रतापामुळे सुमारे ३५० कुटुंबांना अद्यापही उघड्यावर, झोपड्यांमध्येच राहावे लागत आहे. 

केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत सदरबझारमधील लक्ष्मी टेकडीवर ७४८ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४८० घरकुले बांधण्यात येत आहेत. दोन संकुलांमध्ये ही घरकुले विभागली आहेत. या घरकुलांची बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत.

रंगरंगोटी, वीज, पाणी आदी कामे बाकी आहेत. मात्र, काही गावगुंड ठेकेदाराला काम करू देत नाहीत. ‘बीव्हीजी’ सारखी खमकी ठेकेदार कंपनीही या स्थानिक गुंडापुंडांच्या उपद्‌व्यापामुळे मेटाकुटीस आली आहे. 

गेल्या ३५ ते ४० वर्षांत लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी वसली. जागा मिळेल तसे लोक येऊन राहिले. दुष्काळात यातील बहुतेक लोक सोलापूर व जिल्ह्यातून रोजगारासाठी येथे येऊन राहिले आहेत. हळूहळू वस्ती वाढत गेली, तसे जागेअभावी झोपड्यांचे आकारमान कमी होत गेले. काही मंडळींकडे ४०० ते एक हजार चौरस फुटांपर्यंत जागा झोपडपडीने व्यापलेली होती. काहींनी याच जागेत रहिवासाबरोबरच दुकाने चालवली. कोणी वखार घातली तर कोणी भंगार साहित्याचे दुकान. जळण, शेळ्या-मेंढ्यांसाठी या लोकांनी जवळच्या जागा बळकावल्या. काहींनी गरजेपेक्षा अधिक जागा बळकावून झोपड्या भाड्याने दिल्या. आता सर्वांवर पाणी सोडून देऊन पालिका बांधून देत असलेल्या २७५ चौरस फुटांच्या घरात जावे लागणार आहे आणि हेच या गावगुंडांचे दुखणे आहे. हा ‘अन्याय’ असाह्य झाल्यामुळे त्यांनी घरकुलाच्या बांधकामाचे नुकसान करण्यास सुरवात केली आहे. जेणेकरून ठेकेदार पुढे काम करू शकणार नाही, पालिकाही नाद सोडून देईल आणि आपले हित साधता येईल, असा या मंडळींचा डाव आहे. काहींनी लाभार्थ्यांच्या कुटुंबातील महिलांमध्ये अफवा पसरवल्या आहेत.

एवढ्या छोट्या घरकुलात कसं राहायला जायचे, आम्ही आमची गुरं कुठे बांधणार, घरात हागणदारी (स्वतंत्र संडासची व्यवस्था) आम्हाला मान्य नाही, असे काही लोक बोलू लागले आहेत. घरकुलांचे नुकसान केले जात आहे. हे टाळण्यासाठी ठेकेदार कंपनीने ‘वॉचमन’ नेमला. त्यालाही काही लोकांनी मारहाण करून पळवून लावले. या गावगुंडांच्या उद्योगांमुळे गरीब-गरजू लाभार्थ्यांचे नुकसान होत आहे.

सरकारी काम आणि वर्षभर थांब!
घरकुलांचे नुकसान करणारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मध्यंतरी तत्कालीन जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, प्रांत कार्यालयाने पालिकेने नुकसान करणाऱ्यांची नावे कळवावीत, असे सांगितले. सरकारी काम आणि वर्षभर थांब, या उक्तीनुसार पुढे काहीच झाले नाही.

Web Title: satara news gharkun issue