श्रीरामाच्या गजरात ‘श्रीं’च्या पालखीची मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

गोंदवले - श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या १०४ व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरवात झाली अन्‌ श्रींच्या पालखी मिरवणुकीत श्रीराम नामाचा गजर सुरू झाला. ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणाऱ्या पालखी सोहळ्यातही भाविक देहभान विसरून तल्लीन होत आहेत.

गोंदवले - श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या १०४ व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरवात झाली अन्‌ श्रींच्या पालखी मिरवणुकीत श्रीराम नामाचा गजर सुरू झाला. ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणाऱ्या पालखी सोहळ्यातही भाविक देहभान विसरून तल्लीन होत आहेत.

श्री क्षेत्र गोंदवले (ता. माण) येथे महोत्सवाला सोमवारी पहाटे कोठी पूजनाने सुरवात झाली. दहा दिवस चालणाऱ्या महोत्सवानिमित्त श्रींच्या पादुका व प्रतिमेची रोज सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात येते. आज सकाळी दहाच्या सुमारास समाधी मंदिरात श्रींच्या पादुका व प्रतिमेचे पूजन केल्यानंतर श्रीराम नामाचा एकच जयघोष झाला. मंगलमय वातावरणात भाविकांनी रघुपती राघवचा जयघोष सुरू केला आणि श्रींच्या पादुका व प्रतिमा फुलांनी सजविलेल्या पालखीत स्थानापन्न केल्या. भक्तिभावात न्हावून निघालेल्या भाविकांच्या चैतन्यात अधिकच भर पडली. पुन्हा रामनामाचा जयघोष करत हा पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. अग्रभागी श्रींचा बत्ताशा घोडा ताल धरून नाचत होताच. पताकाधारी भाविकही रघुपती राघवच्या सुरातील अभंगात तल्लीन झाले होते. पालखीपुढे टाळ- मृदंगाच्या साथीने भजनी मंडळही अभंगात चिंब झाले होते. तरुणाईचीही पालखीसमोर पाटाच्या पायघड्या घालण्याची सेवा लगबगीने सुरू होती. पालखी मार्गावर जागोजागी पालखीतील पादुका व प्रतिमेला ओवाळून महिला दर्शन घेत होत्या.

संपूर्ण पालखी मार्ग फुलांच्या रांगोळ्यांनी सजून गेला होता. मुख्य अप्पा महाराज चौकातून हा पालखी सोहळा धाकटे श्रीराम मंदिराजवळ येऊन विसावला. येथील श्रीदत्त, नृसिंह, लक्ष्मी मंदिरात आरती होऊन पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. मानाच्या गावकऱ्यांनी पालखीधारकांचे पाय धुवून पालखीचे स्वागत केले. थोरले श्रीराम मंदिरात पालखी आल्यानंतर पुन्हा आरती झाली. या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अश्विनी कट्टे व सदस्यांच्या हस्ते पुष्पहार घालून पालखीचे स्वागत केले. या वेळी ग्रामविकास अधिकारी अमोल पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. श्रींची पालखी मिरवणूक पुन्हा समाधी मंदिरात आल्यानंतर सुवासिनींनी औक्षण केले. त्यानंतर श्रीरामाच्या जयघोषात पुन्हा पालखी समाधी मंदिरात स्थानापन्न झाली. येत्या १२ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. दरम्यान, आज समाधी मंदिरात स्वप्ना खळदकर, शुभांगी जोशी, प्रसाद कुलकर्णी, अपर्णा गुरव, गिरिजाबाई बडोदेकर, पद्माताई तळवळकर यांची गायनसेवा झाली. ब्रह्मचैतन्य मंडळ, शिवनंदन मंडळ, श्रीराम मंडळ, गुरुसिद्ध मंडळ, पल्लभी भिडे, गीताई मंडळ, रोहिणी कुलकर्णी, दुर्गा मंडळ कृष्णाई मंडळ यांनी भजनाचे सादरीकरण केले. मंगेश कुलकर्णी, प्रमा कुलकर्णी, दीपा कुलकर्णी, प्राची साळवी, लतिका सावंत, शिरीष कोरगावकर यांचे कीर्तन झाले. ह. रा. कुलकर्णी यांचे प्रवचन, तर रामराया उपासना यांचे भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.

Web Title: satara news Gondwale Shree Brahmachaitanya Gondwalekar Maharaj