ग्रंथदिंडीने वाचनमेळ्यास प्रारंभ

ग्रंथदिंडीने वाचनमेळ्यास प्रारंभ

सातारा - ज्ञानाचा संस्कार, ग्रंथांची साथ, वाचनाची प्रेरणा देणाऱ्या १९ व्या सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवाचे उद्‌घाटन आज ग्रंथदिंडीने झाले. शहर, परिसरातील तब्बल १७ शाळांनी बेटी बचाव, स्वच्छ भारत, पर्यावरण संवर्धन, वाचन प्रेरणा दिवस, विंदा करंदीकरांवरचा जीवनपट यासह विविध विषयांवर भाष्य करणारे चित्ररथ तयार करून या दिंडीची शोभा वाढवली. 

येथील गांधी मैदान येथे ग्रंथदिंडीचे पूजन नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव, महोत्सव समितीचे अध्यक्ष शंकर सारडा, कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष वि. ना. लांडगे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, प्रा. साहेबराव होळ, मुख्य समन्वयक आर. पी. निकम आदी उपस्थित होते. त्यानंतर राजपथावरून पोवई नाकामार्गे विंदा करंदीकरनगरी, जिल्हा परिषद मैदानापर्यंत ही दिंडी काढण्यात आली. त्यामध्ये शाहूपुरी येथील लोकमंगल हायस्कूलने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतापसिंह शाळेतील शाळा प्रवेशदिनाचा चित्ररथ सादर  केला. मोना स्कूलने स्वच्छ सर्वेक्षणाचे महत्त्व घोषणांद्वारे स्पष्ट केले. ‘स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाही तर कायमचे आजारपण, मेरा शहर साफ हो, इसमे हम सब का साथ हो, सफाई करा रोज, घाणीचा प्रॉब्लेम क्‍लोज,  क्‍लिन ॲण्ड ग्रीन इज अवर परफेक्‍ट ड्रीम’ आदी घोषणांचे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. कन्याशाळेने बेटी बचावचा संदेश दिला. याच शाळेच्या स्काउट गाइड विभागाने मुलींचे महत्त्व सांगणारे, कर्तृत्वान महिलांचे माहिती देणारे फलक हाती धरले होते. इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलने वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व विषद करणारा चित्ररथ बनविला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी बॅंड वादनही केले. 

दातार-शेंदुरे स्कूलने शौचालयाचे महत्त्व सांगणारा स्वच्छ भारत अभियानविषयक चित्ररथ साकारला. तसेच ‘घरोघरी नको ई-कचरा, होऊ द्या त्याचा निचरा, जपा पर्यावरण तरच होईल मानवाचे रक्षण, बी कूल रिसायकल इन स्कूल’ आदी घोषणा देत पथनाट्य सादर केले. न्यू इंग्लिश स्कूलने विंदा करंदीकर जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कवितांचे सादरीकरण केले. अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने गणिताची प्रयोगशाळा चित्ररथाद्वारे साकारली. करंजे पेठ येथील कन्या विद्यालयाचे झांजपथक दाद मिळवून गेले. 
 
कन्याशाळा प्रथम, अनंत द्वितीय
ग्रंथदिंडीत सहभागी शाळांच्या चित्ररथांचे परीक्षण ग्रंथमहोत्सव समितीने केले. त्यांच्या स्पर्धेत साताऱ्यातील कन्याशाळा, अनंत इंग्लिश स्कूल, अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, लोकमंगल हायस्कूल शाहूपुरी, सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल, कन्याशाळा करंजे पेठ यांनी अनुक्रमे प्रथम सात क्रमांक पटकावले, अशी माहिती शिरीष चिटणीस यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com