गुटखा विक्रेत्यांना भरली धडकी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

गुटखा बंदीसाठी आमचे जिकिरीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही या मोहिमेत आम्हाला साथ द्यावी. जिल्ह्यात कोठेही गुटखा विक्री होत असल्यास त्याची माहिती ०२१६२-२३५२२० या क्रमांकावर कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
- राजेंद्र रुणवाल, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन 

सातारा - गुटखा विक्रेत्यांची दुकाने सील करण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मोहिमेमुळे गुटखा विक्रेत्यांना धडकी भरली आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी दुकानदार गुटखा विक्रीपासून फारकत घेत असल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे.

राज्य शासनाने गुटखानिर्मिती व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, लगतच्या राज्यांमध्ये अशी बंदी नसल्यामुळे विक्रेत्यांना सहजरित्या गुटखा विक्रीसाठी उपलब्ध होतो. बंदीमध्ये विक्री करत असल्याने मागेल त्या दराला गुटखा खपत असल्याचे चित्र आहे. त्यातून आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होत असल्याने परराज्यामधून गुटखा आणून राज्यात विकणाऱ्या अनेक टोळ्या गेल्या काही वर्षांमध्ये कार्यरत झालेल्या आहेत. अनेकांनी वैयक्तिक पातळ्यांवर आपल्या खासगी वाहनातून गुटख्याची ने- आण करण्याचा नवा उद्योगही सुरू केला. त्याला प्रमुख कारण होते ते म्हणजे गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी. 

उत्पादन शुल्क विभागाकडे आधीच अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यात हे जादा काम लागल्यामुळे केवळ कागदोपत्री कारवाया करण्याकडेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कल होता. त्यामुळे राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही गुटखा बंदीचे तीन तेरा वाजले होते. दुसरे कारण म्हणते प्रक्रियेला लागणारा उशीर. यापूर्वी उत्पादन शुल्क विभाग एखादा छापा टाकल्यानंतर योग्य त्या कार्यपद्धतीने संबंधित विक्रेत्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करत होते. तो व्हायला सहा महिन्यापर्यंतचा कालावधी लागत होता. विक्रेता मात्र, त्याच दिवशी मोकळा व्हायचा. कारवाईच्या दुसऱ्या दिवशीपासून त्याचा गुटखा विक्रीचा व्यवसाय पुन्हा जोमात सुरू राहात होता. खटला सुरू झाल्यानंतर वकील दिला की काम झाले, अशी मानसिकता विक्रेत्यांची झाली होती. त्यामुळे शहर असो किंवा गाव कोणत्याही टपरी किंवा दुकानावर बिनधास्तपणे गुटख्याची विक्री सुरू होती. या मानसिकतेला हादरा देऊन गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने संबंधित दुकान सील करण्याचे प्रभावी हत्यार उपसले आहे.

कोणत्याही दुकानात किंवा टपरीवर तसेच वाहनात गुटखा सापडला की, ते दुकान किंवा वाहन सील केले जात आहे. त्यामुळे धंदा सुरू करण्यासाठी विक्रेत्याला न्यायालयात जावे लागत आहे. न्यायालयाला सील काढण्यासाठी विनंती करावी लागत आहे. 

या प्रक्रियेला १५ ते महिनाभराचा कालावधी जात आहे. तोपर्यंत विक्रेत्याचा धंदा बंद राहात आहे. दुकान सुरू करण्याला परवानगी मिळते, तीही पुन्हा अशा प्रकारचे कृत्य न करण्याच्या प्रतिज्ञापत्रावर आणि न्यायालय देईल त्या अन्य अटींवर परवानगी मिळत आहे. एक तर, दुकान महिनाभर बंद ठेवावे लागत आहे आणि दुसरे म्हणजे न्यायालयात प्रतिज्ञापत्र करून जर पुन्हा सापडलो तर, कठोर कारवाई होईल, याची धास्ती दुकानदारांना बसली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये गुटखा बंदीनंतर पहिल्यांदा गुटख्याची विक्री थांबण्याच्या मार्गावर आली आहे.

Web Title: satara news gutkha sailer crime