हेल्मेटसक्ती महामार्गांवर, शहरांत नाही- नांगरे पाटील यांची घोषणा

प्रवीण जाधव
गुरुवार, 13 जुलै 2017

'सकाळ'ने मांडलेल्या लोकभावनेची दखल

"शहरामध्ये तसेच वाहनांचा वेग कमी असतो, अशा ठिकाणी हेल्मेटची सक्ती केली जाणार नाही. मात्र, दिवसा वर्दळीच्या असणाऱ्या शहरातील रस्त्यांवर रात्री अकरानंतर अनेक जण भरधाव वेगाने वाहने चालवतात. अशा वाहनचालकांना आम्ही हेल्मेटसक्ती करणार आहे. तशा कारवायांसाठी रात्री विशेष मोहिमा राबविल्या जातील.''
- विश्‍वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

सातारा : येत्या 15 जुलैपासून हेल्मेटसक्ती करण्याच्या पोलिसांच्या आदेशानंतर जिल्ह्यात त्याबाबत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. महामार्गावर ठीक; पण शहरांत अशी सक्ती करणे व्यवहार्य ठरणार नाही, असे मत शेकडो नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी 'सकाळ'च्या माध्यमातून व्यक्त केले. हीच लोकभावना 'सकाळ'ने आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्यासमोर मांडली आणि नांगरे पाटील यांनीही ही बाब सकारात्मक घेत शहरात गाड्यांना वेग नसतो, अशा ठिकाणी हेल्मेटसक्ती करणार नाही, असे जाहीर केले. सर्वसामान्यांना वेठीस धरून, त्रास देऊन कोणतीही मोहीम राबविणार नाही, असे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही स्पष्ट केले.

कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये शनिवारपासून (ता. 15) हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक चांगलाच हडबडला होता. विविध प्रश्‍न आ वासून उभे असताना ही नवी 'ब्याद' कशाला असा 'मध्यमवर्गीय' प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता. सर्वसामान्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. शहरे व वाहनांना वेग नसतो अशा ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती अव्यवहार्य असल्याचे सर्वांचेच मत होते. लोकांच्या भावना विचारात घेऊन 'सकाळ'नेही शहर व ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती केली जाऊ नये, अशीच भूमिका मांडली. लोकांच्या प्रतिक्रियांना सातत्याने स्थान देत हा विषय लावून धरला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही त्याला साथ देत राज्य व महामार्गाव्यतिरिक्त हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविला. अनेकांनी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचाही निर्णय घेतला.

हेल्मेट सक्तीबाबत जिल्ह्यातील नागरिकांची ही भूमिका 'सकाळ'ने नांगरे पाटील व संदीप पाटील यांच्यासमोर आज मांडली. त्यानंतर लोकभावनेचा विचार करूनच कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी भूमिका दोघांनीही मांडली. नांगरे पाटील म्हणाले, 'लोकांमध्ये प्रबोधन करून टप्प्याटप्प्याने त्यांना हेल्मेट वापरासाठी प्रवृत्त करण्याचा हा विषय आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही वाहतुकीच्या विषयावर काम करत आहोत. त्यातून 550 अपघात टळले, तर 280 जणांचे जीव वाचविण्यात यश आले. हे मोठे काम आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक प्रभावी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरवातीच्या टप्प्यात शाळा- महाविद्यालये, उद्योग-धंदे याठिकाणी जाऊन आम्ही प्रबोधन करणार आहोत. तेथील कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त करणार आहे.

त्याचबरोबर नियमानुसार वाहन विक्रेत्यांना वाहनाबरोबर हेल्मेट देणे बंधनकारक आहे. नंतर हेल्मेट खरेदी करायला लोकांना नको वाटते, त्यामुळे वाहन घेतानाच ते दिले जावे, असा आमचा आग्रह आहे. तशा नोटीस वाहन विक्रेत्यांना दिल्या आहेत.
नागरिाकांच्या प्रबोधनासाठी सामाजिक संस्था व एनजीओंचीही मदत घेतली जाणार आहे. भरधाव वेगात वाहने असतात, त्या ठिकाणी हेल्मेट सक्ती आवश्‍यक आहे. त्यामुळे अशी ठिकाणे पोलिसांकडून निश्‍चित केली जाणार आहेत. त्याठिकाणीच हेल्मेट सक्ती केली जाईल. शहरामध्ये तसेच वाहनांचा वेग कमी असतो, अशा ठिकाणी हेल्मेटची सक्ती केली जाणार नाही. मात्र, दिवसा वर्दळीच्या असणाऱ्या शहरातील रस्त्यावर रात्री अकरानंतर अनेक जण भरधाव वेगाने वाहने चालवतात. अशा वाहनचालकांना आम्ही हेल्मेट सक्ती करणार आहे. तशा कारवायांसाठी रात्री विशेष मोहीम राबविल्या जातील.''

लोकभावनेचा विचार करूनच पोलिस दलाचे काम चालेल, सर्वसामान्यांना त्रास देण्याचा उद्देश नाही, असे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, 'पहिल्या टप्प्यात वाहप्तुकीचे इतर नियम मोडणाऱ्यांवर (लायसन्स नसणे, ट्रिपल सिट, भरधाव वेगात वाहन चालविणे) कारवाई केली जाणार आहे. शाळा-महाविद्यालये व कंपन्यांमध्ये हेल्मेट वापराबाबत प्रबोधन केले जाईल. वृद्ध व महिलांवर सक्ती नसेल. अनावश्‍यक ठिकाणी सर्वसामान्यांना त्रास दिला जाणार नाही. प्रबोधनावर अधिक भर दिला जाईल.''

'लोकभावनेचा विचार करूनच पोलिस दलाचे काम चालेल. सर्वसामान्यांना त्रास देण्याचा उद्देश नाही. वृद्ध व महिलांवर सक्ती नसेल. पहिल्या टप्प्यात वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्यांवर (लायसन्स नसणे, ट्रिपल सिट, भरधाव वेगात वाहन चालविणे) कारवाई केली जाणार आहे.''
- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news helmet compulsion cities exempted