पावसामुळे महामार्गाची दैना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

सातारा - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरालगतच्या उड्डाणपुलांचे घोंगडे भिजत पडलेच आहे. तोपर्यंत आता पावसामुळे रिलायन्स व ठेकेदारांच्या अनागोंदी कामकाजाला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. उड्डाणपुलालगत योग्य पद्धतीची गटार व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यातून वाहून रस्ते खचले आहेत, तर बहुतेक ठिकाणी रस्त्यांना पाटाचे रूप आले आहे. या समस्यांना वाहनचालकांना तोंड द्यावे लागत आहे. 

सातारा - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरालगतच्या उड्डाणपुलांचे घोंगडे भिजत पडलेच आहे. तोपर्यंत आता पावसामुळे रिलायन्स व ठेकेदारांच्या अनागोंदी कामकाजाला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. उड्डाणपुलालगत योग्य पद्धतीची गटार व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यातून वाहून रस्ते खचले आहेत, तर बहुतेक ठिकाणी रस्त्यांना पाटाचे रूप आले आहे. या समस्यांना वाहनचालकांना तोंड द्यावे लागत आहे. 

राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून कंत्राटदार रिलायन्स कंपनी, उपठेकेदार यांच्या कामातील त्रुटी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष यासह विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे. काम सुरू झाल्यापासून अनेकदा काम पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या डिसेंबरपर्यंतची मुदत दिली असली, तरी अद्यापही काम पूर्ण होण्याच्या टप्प्यात नाही. सध्या जिल्ह्यातील २३ ठिकाणी विविध कारणांनी हे काम रखडलेले आहे. सातारा शहरालगत शिवराज फाटा, वाढे फाटा, पाचवड यासह पाच ठिकाणी वीज वाहक वाहिन्या बदलण्याचे काम अपूर्ण राहिल्याने उड्डाणपुलांचे काम अपूर्ण राहिले आहे. 

गेली तीन वर्षे उड्डाणपुलांचे काम अपूर्ण असल्याने सर्व वाहतूक सेवा रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. सध्याच्या पावसात या ठेकेदारांच्या कामाचा पर्दाफाश झालेला दिसून येत आहे. सातारा शहरालगत सेवारस्त्यांची अतिशय दैना झाली आहे. डोंगर उतारावरून, उड्डाणपुलांवरून येणारे पावसाचे पाणी वाहण्यासाठी योग्यरित्या गटार व्यवस्था केली नसल्याने हे पाहणी सेवारस्त्यांवरून वाहत आहे. रस्ता मध्यभागी खचल्याने त्या भागावरून पाटातून पाणी सोडल्याप्रमाणे वाहत आहे. त्यात खड्ड्यांनीही भर घातली आहे. उड्डाणपुलांना लागून, तसेच सेवारस्त्यांच्या मध्यभागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन खड्ड्यातून चालविल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच सातत्याने वाहने त्यातून जात असल्याने खड्डेही आकाराने मोठे बनले आहेत. परिणामी, दुचाकीस्वार या खड्ड्यात आदळल्यास ती व्यक्‍ती जायबंदी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती बनली आहे. 

उड्डाणपुलांवरून पाणी न साचता बाहेर जाण्यास मार्ग नसल्याने वळसे, शेंद्रे येथे महामार्गावरच पाणी साचत आहे. मोठी वाहने या पाण्यातून गेल्यास दुचाकीस्वारांना ‘अंघोळ’च करावी लागत असते. शेंद्रे येथे महामार्गावर पाणी साठून राहत असल्याने दुर्घटना घडण्याची संभावनाही वाढत आहेत.

सेवारस्ते ग्रासले खड्ड्यांनी
शिवराज फाटा ते अजंठा चौक येथील उड्डाण पुलांचे काम अद्याप सुरू असून, तेथे पावसाचे पाणी थेट पुलांवरून सेवारस्त्यावर कोसळत आहे. त्यातून खडी, मातीही वाहून येत खालील गटारांत मुरूम, मातीचे ढीग साचले आहेत. शिवराज फाटा, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील सेवारस्त्यांना खड्ड्यांनी ग्रासले आहे. दिवसेंदिवस हे खड्डे आकाराने मोठे होत आहेत. खड्ड्यांत वाहने आदळून वाहनांचे मोठे नुकसानही होत आहे. परिणामी, वाहनधारकांना महामार्गासह सेवारस्त्यावर वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढण्याची संभावना आहे.

Web Title: satara news Highway potholes