फळबाग लागवड उद्दिष्टात घट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

काशीळ - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ मध्ये सातारा जिल्ह्यासाठी दोन हजार ८२५ हेक्‍टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत उद्दिष्टात एक हजार ७१४ हेक्‍टरने घट करण्यात आली आहे. गतवर्षी जिल्ह्यासाठी चार हजार ५३९ हेक्‍टरवर फळबाग लागवडीचा लक्ष्यांक होता. त्यापैकी ८४०.५७ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली. 

फलोत्पादन संचालनालय, ग्रामपंचायत व कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पडीक जमीन, सलग जमीन व बांधावर फळबाग लागवडीसाठी ‘मनरेगा’तून प्रोत्साहन देण्यात येत आहे. जिल्ह्यात २०१८-१९ साठी दोन हजार ८२५ हेक्‍टर क्षेत्राचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक खटाव तालुक्‍यास ४९५ हेक्‍टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. फळबाग लागवड योजनेंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कोकम, फणस, अंजीर, सुपारी या फळझाडांची लागवड केली जाते. लागवडपूर्व मशागत, लागवड, संगोपन करण्यासाठी मजुरी, रोपे, खते यासाठी तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पीकनिहाय मापदंडानुसार निधी दिला जातो. मजुरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तर खते आणि रोपांसाठीचा निधी संबंधित एजन्सीच्या खात्यावर थेट जमा करण्यात येतो. जिल्ह्यात जलसंधारणांच्या कामांमुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. गतवर्षी चार हजार ५३९ हेक्‍टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यावर्षी मात्र, एकूण क्षेत्रात एक हजार ७१४ हेक्‍टरने घट करत दोन हजार ८२५ हेक्‍टर उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गतवर्षी फळबाग लागवड क्षेत्र ८४०.५७ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच १८.५१ टक्के पूर्ण करण्यात आले आहे.  सातारा जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टासाठी कृषी विभागाकडून नियोजन केले जात असून प्रत्येक कृषी सहायकांसाठी लक्ष्यांक निश्‍चित केला जात आहे.

तालुकानिहाय उद्दिष्ट 
तालुकानिहाय उद्दिष्ट लागवड क्षेत्र (हेक्‍टर) ः सातारा २७७, कोरेगाव २०२, खटाव ४९५, कऱ्हाड २१९, पाटण ४३५, वाई २०७, जावळी १६४, खंडाळा ७४, महाबळेश्वर १३८, फलटण २१७, माण ३९६. 

Web Title: satara news Horticulture plantation target reduction