पालिकेतील बाबू म्हणतात ‘सांगा वागायचं कसं?’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

सातारा - ‘एकानं सांगायचं अमूक करा...तर दुसऱ्याने सांगायचं करू नका! दोन्ही पैकी एकाच्या आदेशाचे पालन करावेच लागणार; की झाली रुसारुशी. पदाधिकारी लागलीच टाहो फोडतात कर्मचारी ऐकत नाहीत, बदलून टाका!’ कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतील हे नेहमीचे चित्र! सातारा पालिकेतील कर्मचारी सध्या या प्रसंगातून जात आहेत. निमित्त आहे, प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी काढलेल्या काही विभागप्रमुखांसह १४ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे! 

सातारा - ‘एकानं सांगायचं अमूक करा...तर दुसऱ्याने सांगायचं करू नका! दोन्ही पैकी एकाच्या आदेशाचे पालन करावेच लागणार; की झाली रुसारुशी. पदाधिकारी लागलीच टाहो फोडतात कर्मचारी ऐकत नाहीत, बदलून टाका!’ कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतील हे नेहमीचे चित्र! सातारा पालिकेतील कर्मचारी सध्या या प्रसंगातून जात आहेत. निमित्त आहे, प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी काढलेल्या काही विभागप्रमुखांसह १४ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे! 

मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा या बदल्यांच्या आदेशावर सह्या केल्याचे समजते. आज सकाळी कर्मचारी कामावर हजर झाले तेव्हा १४ जणांच्या हातात बदली आदेश पडले. यातील काही कर्मचारी विभागप्रमुख म्हणून काम पाहतात. कार्यालयीन कामकाजाच्या सोईसाठी या बदल्या करण्यात आल्याचे प्रशासनाचे ‘छापील’ म्हणणे असले तरी ‘मी सांगितलेले काम ऐकत नाहीत,’ असा यामधील काहींच्यावर नूतन पदाधिकाऱ्यांनी ठपका मारला आहे. त्यातूनच ही खांदेपालट करण्यात आल्याचे समजते. 

सहायक मिळकत व्यवस्थापक प्रशांत खटावकर यांना स्थावर जिंदगीतून आस्थापना विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाग निरीक्षक विश्‍वास गोसावी ‘स्थावर’मध्ये तर भांडार विभागप्रमुख देविदास चव्हाण यांना जन्म-मृत्यू नोंदणी विभाग दाखवण्यात आला आहे. ‘जन्म मृत्यू’चे सुनील भोजने यांना भांडार विभाग सांभाळावा लागणार आहे. पालिकेत सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा शहर विकास विभाग समजला जातो. या विभागात शिपाई म्हणून अनेक वर्षे कार्यरत असलेल्या अशोक गवळी यांना नगराध्यक्षांच्या कक्षाचे शिपाई म्हणून काम पाहावे लागणार आहे. त्यांच्या जागेवर जयेंद्र माने यांना पाठविण्यात आले आहे.  

वाहतूक विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे प्रशांत निकम यांना अतिक्रमण विरोधी विभागात टाकण्यात आले असून, त्यांच्या जागेवर ‘अतिक्रमण’चे राजेश भोसले काम पाहणार आहेत. आस्थापना विभाग सांभाळणारे राजेश काळे यांना सभा कामकाज सचिवाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यसंवर्गातील अधिकारी असलेल्या श्री. काळे यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते पालिकेबाहेर बदलीस पात्र आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर अन्य कर्मचारी नेमावा लागणार आहे. 

पदाधिकाऱ्यांच्या रुसव्याफुगव्यातून यातील काही बदल्या झाल्या असल्याचे नाराज कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दोन पदाधिकारी परस्परविरोधी आदेश देतात. ऐकायचं कोणाचं? पदाधिकाऱ्यांत ताळमेळ नाही. प्रती नगरसेवकांचा सुळसुळाट झालाय, असाही त्यांचा आक्षेप आहे. अपुरे कर्मचारी असताना प्रसंगी आम्ही शिंगावर घेऊन काम केले. कधी घड्याळाकडे का सुटी-सणवार पाहिला नाही. आत्ता कुठे घडी बसायला लागल्यानंतर आपला विभाग आयता दुसऱ्याच्या हातात देऊन जायचे, हा अन्याय नाही का? बदली हा सरकारी नोकरीमधील अविभाज्य भाग आहे. मात्र, हे बदल चांगले काम करूनही नशिबी येत असतील तर ‘तुम्हीच सांगा कसं वागायचं ते?’ असा या कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न आहे. 

‘स्थावर जिंदगी’मागील शुक्‍लकाष्ट संपेना
बदली आदेश निघालेल्यापैकी एक कर्मचारी आज सकाळी आपल्या कक्षाला कुलूप लावून निघून गेला. त्याने बदली आदेश स्वीकारला नसल्याचे समजते. काही वर्षांपूर्वी वसुली विभागातील अनियमिततेचा ठपका या कर्मचाऱ्यावर आहे. आता त्याला स्थावर जिंदगी विभागात नेमणूक देण्यात आली आहे. ‘स्थावर जिंदगी’ या विभागामागील शुक्‍लकाष्ट काही संपेना, अशी पालिका वर्तुळात चर्चा आहे. 

Web Title: satara news how to talk by municipal employee