सिव्हिलमधील राजेशाहीला लगाम कोण घालणार? 

सिव्हिलमधील राजेशाहीला लगाम कोण घालणार? 

सातारा - न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर अनेक गुन्ह्यांतील राजकीय वरदहस्त व आर्थिक बळ असणाऱ्या लोकांसाठी जिल्हा रुग्णालय नंदनवन बनत चालले आहे. मोबाईल बिनधास्त वापरा, मटणाच्या पार्ट्या झोडा, कोणी अडविणारे नाही, अशी परिस्थिती पाहून सर्वसामान्य रुग्ण अवाक्‌ होत आहेत. जिल्हा रुग्णालयातील या राजेशाहीला लगाम कोण घालणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

न्यायालयीन कोठडीतील रुग्णाला जिल्हा रुग्णालय हक्काचे ठिकाण ठरत आहेत. मात्र, मालदार आणि वजनदार संशयितांना पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर अगर एखाद्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यावर त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास सुरू होतो. छातीत दुखू लागते. त्यामुळे त्यांना जिल्हा कारागृहाऐवजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारात वाढ झाली आहे. खंडाळा तालुक्‍यातील जमिनीचा गैरव्यवहार असो अथवा खटाव तालुक्‍यातील दुष्काळ निधीचा अपहार असो, कंपनी चालकाला खंडणीसाठी मारहाणीचे प्रकरण असो... किंवा खासगी सावकारीतील संशयित असो... या सर्वांना अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसांत रुग्णालयात "जागा' मिळाली. संशयितांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करत खटाव आणि खंडाळ्यातून आंदोलनाचे इशारेही देण्यात आले, तरीही जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाच्या कारभारात सुधारणा झाली नाही. राजकीय दबावातून, तसेच आर्थिक आमिषामुळे हे होत असल्याचा आरोप आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांनी केला होता. 

आता त्या पुढच्या गोष्टी जिल्हा रुग्णालयातील संशयितांच्या कोठडीत दिसून येत आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेले हे आजारी संशयित बिनधास्तपणे मोबाईल वापरत आहेत. मित्र व नातेवाईकांशी त्यांचा राजरोस संपर्क होत आहे. कोणी कुठे, कशी काय मदत करायची, याचे नियोजन होत आहे. अनेक जण आपले व्यवसायही या ठिकाणाहून चालवत आहेत. त्याचबरोबर आजारी असलेल्या या संशयितांना मटण, चिकन, मासे असे चमचमीत जेवणही मिळत आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असूनही त्यांची पार्टी सुरू आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास हे चित्र नित्यानेच येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील संशयितांचा हा थाट पाहून तेही अवाक्‌ होत आहेत. 

रुग्णालय व्यवस्थापन यांना दाखल कसे करून घेते, असा प्रश्‍न नेहमी उपस्थित होतो. आता त्या पुढची पायरी गाठली गेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलिस काय करतात, असाही प्रश्‍न उपस्थित होतो आहे. न्यायालयीन कोठडीतून जिल्हा रुग्णालयात कोणत्या सुविधा मिळू शकतात, याचा फलकच पोलिसांनी लावावा अशी मागणी होत आहे. 

पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी 
पोलिस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी जीव तोडून काम करत संशयितांना अटक करतात. गुन्ह्याची तीव्रता पाहून न्यायालय निर्णय घेत आहे. मात्र, संशयितांना अशा प्रकारच्या सुविधा मिळत असतील तर, संबंधितांच्या मनात कायद्याचा धाक कसा निर्माण होणार, असा प्रश्‍नही नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com