कासच्या हंगामावर पावसाचे पाणी! 

शैलेन्द्र पाटील
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

ऑनलाइन बुकिंग प्रभावी! 
तब्बल 33 हजार पर्यटकांनी "ऑनलाइन बुकिंग' सेवेचा लाभ घेतला. कासला पर्यटक किती येतात, यापेक्षा कसे येतात आणि पठारावर कसे वागतात, हे अधिक महत्त्वाचे आहे. नियंत्रित पर्यटनासाठी सुटीच्या दिवशी "ऑनलाइन' नोंदणीवर भर देण्याचा निर्णय देणारे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर व त्याची अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करणारी कास पठार कार्यकारी समिती व सातारा-जावळी वन विभाग यांना थोडे अधिक गुण निश्‍चित द्यावे लागतील! 

सातारा - जागतिक वारसा सांगणाऱ्या कास पठारावरील फुलांच्या गालिचावर यंदा परतीच्या पावसाचे पाणी पडले. त्यामुळे साधारण दोन महिने चालणारा हंगाम यंदा 40 दिवसांत आटोपता घ्यावा लागत आहे. पावसामुळे फुलांचा बहर दीर्घकाळ टिकला नाही; परिणामी 15 ऑक्‍टोबर रोजी यंदाच्या हंगामाची सांगता करण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्याही सुमारे 50 हजारांनी रोडावली. "विकएंड'ला कासला येणाऱ्या या पर्यटकांनी अन्य वाटा धुंडाळल्याचे स्पष्ट झाले. 

जूनच्या पहिल्या पावसात फक्त कास पठारावर येणारा "वाय तुरा' हे अस्सल सातारी फूल दिसू लागले, की कासच्या फुलांच्या मोसमाची ती सुरवात समजली जाते. साधारण ऑगस्टपासून पठार फुलायला सुरवात होते. सप्टेंबर, ऑक्‍टोबर हा पठारावरील रानफुलांच्या बहराचा टिपेचा काळ समजला जातो. यावर्षी परतीच्या पावसाने काससह सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसला. ऊन आणि मधूनमधून पाऊस हे कासच्या फुलांसाठी पोषक वातावरण समजले जाते. तथापि, पावसाच्या तडाख्याने कासचा बहर यंदा वेळेआधीच कोमेजला. पठारावर आता तुरळक फुले पाहायला मिळतात. 

कासच्या हंगामाची माहिती देताना जावळीचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी सांगितले की, ""कास पठाराच्या देखरेखीसाठी नेमलेल्या कार्यकारी समितीने एक सप्टेंबरपासून पर्यटन शुल्क आकारणी सुरू केली. गेल्या 40 दिवसांत पठारावर 75 हजार पर्यटकांनी हजेरी लावली. गेल्या वर्षी कासचा हंगाम सुमारे दोन महिने चालला होता. पठारावरील फुले कमी झाल्याने येत्या रविवारी (ता. 15) हंगामाची सांगता करण्यात येत आहे.'' 

आकडे बोलतात... 
1,26,000 
(गेल्या वर्षीची पर्यटकांची संख्या) 

75,000 
(यावर्षी कासला भेट दिलेले पर्यटक) 

Web Title: satara news kaas pathar environment