कास करूया स्वच्छ !!!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

कास परिसरात वनभोजनाचा आनंद घेतला नाही, असा सातारकर शोधूनही सापडणार नाही. जेवणानंतर नको असलेले साहित्य तेथेच टाकणे, ही सहज वृत्ती आहे.  कास तलावाला प्लॅस्टिक कचऱ्यातून बाहेर काढण्यासाठी ‘सकाळ’ने एक जानेवारी रोजी श्रमदानातून कास स्वच्छतेची हाक दिली आहे. प्रत्येक रविवारी कासमध्ये स्वच्छता मोहीम चालेल. त्यात एक रविवार ‘कास’साठी द्यावा. ‘सकाळ’च्या कास स्वच्छता अभियानात श्रमदानाद्वारे सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सकाळ’ व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले आहे. 

कास परिसरात वनभोजनाचा आनंद घेतला नाही, असा सातारकर शोधूनही सापडणार नाही. जेवणानंतर नको असलेले साहित्य तेथेच टाकणे, ही सहज वृत्ती आहे.  कास तलावाला प्लॅस्टिक कचऱ्यातून बाहेर काढण्यासाठी ‘सकाळ’ने एक जानेवारी रोजी श्रमदानातून कास स्वच्छतेची हाक दिली आहे. प्रत्येक रविवारी कासमध्ये स्वच्छता मोहीम चालेल. त्यात एक रविवार ‘कास’साठी द्यावा. ‘सकाळ’च्या कास स्वच्छता अभियानात श्रमदानाद्वारे सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सकाळ’ व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले आहे. 

कास परिसरातील जैवविविधता 
    वन्यप्राणी-बिबट्या, रानडुक्कर, भेकर, सायाळ, रानमांजर, तरस आदी दहा प्रकारचे वन्यजीव प्रामुख्याने आढळतात. या भागात चौशिंग्यानेही अनेकदा दर्शन दिले आहे. 
    उभयचर व सरपटणारे प्राणी-विविध प्रकारचे सरडे, १० प्रकारचे साप व बेडूक
    वन्यपक्षी-शिक्रा, गरुड, रानवे, धनेश, बुलबुल आदी ३० प्रकारचे पक्षी दिसतात.
    कीटक व फुलपाखरे-रेड हेलेने, ब्ल्यू टायगर, सिल्व्हर लाईन, सनबीम, पेन्टेड लेडी, ओकलिफ आदी ३२ प्रकारची फुलपाखरे प्रामुख्याने आढळतात. 

...का करायची स्वच्छता
    न कुजणारा प्लॅस्टिक कचरा पावसाळ्यात तलावात वाहून जातो. उन्हामुळे प्लॅस्टिकमधून घातक वायू बाहेर पडतो. त्यामुळे हवा व जलप्रदूषण होते. 
    प्लॅस्टिक कचऱ्याला लागलेल्या अन्नपदार्थाच्या वासाचे वन्यजीव, पाळीव जनावरे ते खाण्याचा प्रयत्न करतात. प्लॅस्टिक पोटात जाऊन अपाय होतो. 
    शिजवलेले मांस वन्यजिवांचे अन्न नाही. ते मिळू लागल्याने खायला चटवतात. न मिळाल्यास हिंस्त्र बनतात. 

आज ‘सकाळ’मध्ये बैठक
लोकसहभागातून ‘सकाळ’ने कास तलाव परिसर स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. या अभियानात श्रमदान करून नागरिकांनी हातभार लावावा. कास स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या सूचना, कल्पना, अपेक्षा जाणून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक उद्या (बुधवारी) रात्री सात वाजता, पोवई नाक्‍यावरील ‘सकाळ’ कार्यालयात होत आहे. ही बैठक ‘कास’वर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी खुली आहे. आपल्या सूचना लेखी स्वरूपात आणल्या तरी चालतील.

...असं आहे कास 
सातारा शहराला गेली १३२ वर्षे विनाप्रदूषित, शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उभारणी उरमोडी नदीच्या उगमाच्या जागेवर आहे. धरणाची भिंत, सुरवातीचा चार किलोमीटरचा कातळ खोदून काढलेला दगडी बोगदा व आवश्‍यक ठिकाणी बंदिस्त पाइपलाइन व नंतरचा २२ किलोमीटरचा उघडा पाट या कामासाठी तीन लाख ६९ हजार १६४ रुपये इतका खर्च आला. २५-३० हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या त्यावेळच्या सातारा पालिकेने कर्ज काढून धरण बांधले. ता. १५ मार्च १८८६ रोजी कास धरणातून पाटात पाणी सोडण्यात आले. हे पाणी पाटातून साताऱ्यापर्यंत पोचण्यासाठी लागले तब्बल १५ दिवस...

शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या साताऱ्याच्या कास तलावाची कहाणी जेवढी जुनी आहे, तितकीच ती रोचकही आहे. नैसर्गिक भूरचनेचा आधार घेऊन तीन बाजूंना असणाऱ्या डोंगरांचा आधार घेत चौथ्या बाजूस छोटी भिंत घालून कास तलाव तयार करण्यात आला. नैसर्गिक उताराचा आधार घेत, सायफन पद्धतीने कासचे पाणी २६ किलोमीटरहून साताऱ्यात आणण्यात आले. कास तलावाविषयी अधिकृत नोंदी फार त्रोटक असल्या तरी सातारा नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या काही जुन्या सरकारी कागदपत्रांमध्ये काही संदर्भ मिळतात. त्यानुसार १८६२ पूर्वी सातारा शहराला यवतेश्‍वर मधील ओघळांचे पाणी एकत्र करून पुरविले जात होते. हे पाणी कमी पडत असल्याने ब्रिटिशांनी कास गावाजवळ १८७५ मध्ये सर्वेक्षण सुरू केले. १८८१ मध्ये मातीच्या धरणाच्या कामाला सुरवात झाली.

त्याकरिता कास गावाचे पुनर्वसन जवळच्या टेकडीवर करण्यात आले. पाच वर्षे धरणाचे काम पूर्ण होण्यास लागली. मातीची भिंत बांधून कास ते सांबरवाडीपर्यंत २६ किलोमीटरचा पाट खोदण्यात आला. १८८५ मध्ये धरण पूर्ण झाले. कास योजनेला अंदाजपत्रकापेक्षा ६७ हजार रुपये जादा खर्च आल्याची नोंद सरकारी कागदपत्रांत मिळते. कास तलाव आणि त्याच्या भोवतालचे क्षेत्र सातारा नगरपालिकेच्या मालकीचे आहे. त्याबाहेर वन विभागाचे तसेच काही खासगी क्षेत्र लागते. 

लाखो नैसर्गिक झरे आणि पठारावर पडलेले पावसाचे पाणी कातळाच्या भेगांमध्ये झिरपून, गाळून तलावात साठत असल्याने तलावातील पाणी मुळातच शुद्ध आहे. आता पूर्ण कास पाट बंदिस्त झाला आहे. त्यामुळे कोणत्याही गावाचे सांडपाणी या पाण्यात मिसळण्याचा प्रश्‍नच येत नाही. पालिका नागरिकांना पुरवत असलेल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने तपासणीसाठी घेतले होते. यात शुद्धतेमध्ये सातारा पालिकेचा राज्यात पहिला क्रमांक आला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री अजित पवार यांनीही याबद्दल सातारा पालिकेचे कौतुक केले होते. अर्थात शुद्धतेच्या बाबत सातारा पालिकेपेक्षा कासच्या नैसर्गिक परिस्थितीला १०० पैकी १०० गुण द्यावे लागतील. कारण तेथील वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक रचनेमुळे सातारकरांना आजही शुद्ध व मुबलक पाणी मिळते ! 

आपला सहभाग, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक या अभियानाचे समन्वयक, वरिष्ठ बातमीदार शैलेन्द्र पाटील यांच्याकडे नोंदवावा. 
कोणतीही शंका असल्यास, अडचण आल्यास श्री. पाटील 
(मोबाईल ९८८११३३०८५) यांच्याशी संपर्क साधावा. 

Web Title: satara news kas cleaning