कास स्वच्छतेत वृत्तपत्र विक्रेत्यांचे ‘हात’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

सातारा - उन्हाळा असो अगर पावसाळा, सणवार कोणताही असो, रोज पहाटे उठून सकाळ-सकाळीच नित्यनियमाने वृत्तपत्र वाचकांच्या हातात देण्याचे काम करणारे वृत्तपत्र विक्रेत्यांचे हात कास स्वच्छता मोहिमेला लागले. या विक्रेत्यांनी सकाळी वेळ मिळत नाही म्हणून सायंकाळी कासला जाऊन चार ते सहा या वेळात श्रमदान केले. शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील चिमुरड्यांनीही निसर्गात जाताना कचरा करणार नाही, असा निश्‍चय केला.

‘सकाळ’च्या पुढाकाराने लोकसहभागातून सुरू झालेल्या कास स्वच्छता मोहिमेत गेल्या आठवड्याभरापासून सातारा शहरातील वृत्तपत्र विक्रेते श्रमदानासाठी यायचे आहे, म्हणून पाठपुरावा करत होतो. मात्र, सकाळची वेळ त्यांच्यासाठी वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोचविण्याची असते. रोजच्या कामात खडा न करता स्वच्छतेचे कर्तव्य पार पाडण्याचा मनोदय राजेंद्र माळी, ताजुद्दीन आगा यांनी ‘सकाळ’जवळ बोलून दाखवला. शेवटी सायंकाळी श्रमदान करण्याचे ठरले. स्वेच्छेने श्रमदानासाठी येणाऱ्या २५ जणांची यादी तयार झाली. मात्र, त्यांना नेण्या-आणण्यासाठी वाहनाची अडचण होती. ही बाब सावकार ट्रान्स्पोर्टचे संचालक, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी यांना समजल्यानंतर त्यांनी हा प्रश्‍न चुटकीसरशी सोडवला. ‘त्यात काय एवढं, किती वाजता बस पाठवू सांगा,’ असं म्हणत श्री. गवळी यांनी चालकाला बुधवारी दुपारी कासला जाण्याबाबत सूचित केले. 

श्रमसंस्काराचा भाग म्हणून शाहूपुरीचे माजी सरपंच भारत भोसले यांनी शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील पाचवी ते सातवीच्या ३० विद्यार्थ्यांना शिक्षकांसह कासला पाठविले. जगदीश भोसले, संजय बारंगळे व अभय भोसले या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वृत्तपत्र विक्रेते व विद्यार्थ्यांनी खांद्याला खांदा लावून कास तलावाच्या सांडव्याच्या बाजूची स्वच्छता केली. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, श्री. गवळी, मोहिमेतील समन्वयक डॉ. दीपक निकम, विनोद यादव उपस्थित होते. राजेंद्र माळी, ताजुद्दीन आगा, प्रवीण शिंदे, सुनील जाधव, विकास क्षीरसागर, नितीन गुरव, लहुराज लवळे, विजय जाधव, तुषार शिंदे, संतोष धोंडवड, राजेंद्र गजधर्ने, आनंद धोंडवड, युवराज आगलावे, सचिन लबडे, हमीद खान, शिवाजी माने, सुरेश जाधव, दीपक पोळ, सुदर्शन पोळ, संजय माने, बाळकृष्ण माने, सतीश गजधर्ने व शुभम खाप्रे या वृत्तपत्र विक्रेत्यांनी श्रमदानात भाग घेतला.

Web Title: satara news kas cleaning newspaper sailer