कृष्णा नदीच्या पाण्यात पुन्हा जलपर्णी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सातारा - कृष्णा नदीत पुन्हा एकदा जलपर्णी उगविण्यास सुरवात झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणी स्थिर आहे, अशी ठिकाणी जलपर्णी मोठ्या प्रमाणात आहे. कृष्णाकाठच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या काही योजनांच्या ठिकाणांनाही जलपर्णीचा विळखा पडण्यास सुरवात झाली आहे. आता ही जलपर्णी हटविण्यासाठी सर्वांनी आपापल्या परिसरात श्रमदानातून मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. 

सातारा - कृष्णा नदीत पुन्हा एकदा जलपर्णी उगविण्यास सुरवात झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणी स्थिर आहे, अशी ठिकाणी जलपर्णी मोठ्या प्रमाणात आहे. कृष्णाकाठच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या काही योजनांच्या ठिकाणांनाही जलपर्णीचा विळखा पडण्यास सुरवात झाली आहे. आता ही जलपर्णी हटविण्यासाठी सर्वांनी आपापल्या परिसरात श्रमदानातून मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. 

कृष्णा नदीकाठची गावे, तसेच प्रमुख शहरांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन त्यामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुळात प्रदूषित पाण्यातच जलपर्णी मोठ्या प्रमाणात उगवते. गेल्या वर्षी उगम ते संगम अशी कृष्णा नदी स्वच्छतेची मोहीम ‘सकाळ’ने हाती घेतली. त्यास वाई, सातारा आणि कऱ्हाडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. स्वयंस्फूर्तीने काही गावे व शहरातील नागरिक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. वाई पालिका, कऱ्हाड पालिकेनेही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला; पण नदी पात्रात मिसळणारे सांडपाणी रोखण्याची उपाययोजना करण्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.

जिल्हा परिषदेने नदीकाठच्या १२० गावांतील सांडपाणी नदी पात्रात मिसळू नये म्हणून शोष खड्डे काढण्याची मोहीम राबविली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची मोहीमही राबविली जात आहे. त्यामुळे गावांचे सांडपाणी थांबविण्यात यश येईल; पण मोठ्या शहरांचे सांडपाणी रोखण्याचे उपाय होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

सध्या कृष्णा नदी पात्रात ज्या ज्या ठिकाणी पाणी वाहते नाही, अशा ठिकाणी जलपर्णी उगविण्यास सुरवात झाली आहे. आता तिचे प्रमाण अल्प आहे म्हणूनच ती हटविणे गरजेचे आहे. जलपर्णीचा विळखा पाणी योजनांच्या परिसराला पडण्यापूर्वी लोकसहभागातून जलपर्णी हटविण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. त्यासाठी आता गावातील तरुण मंडळांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

खासदारांचा पुढाकार गरजेचा
कृष्णा नदीपात्रात एकट्या सातारा शहरातून १३ एमएलडी सांडपाणी मिसळते. हे पाणी शुद्ध करून ते नदी पात्रात सोडण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सातारा पालिकेने करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेतल्यास सर्व काही शक्‍य होईल.

Web Title: satara news krishna river jalparni