कडकडीत "बंद'ला साताऱ्यात गालबोट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

कोठे काय घडले?  
- साताऱ्यातील किरकोळ प्रकार वगळता इतरत्र "बंद' शांततेत 
- मेढ्यात प्रतिमोर्चामुळे काही काळ तणाव 
- कऱ्हाड, मायणी, फलटण, वाई, पाटण, पाचगणीसह विविध ठिकाणी मोर्चे 
- म्हसवडमधील व्यवहार सुरळीत 
- एसटी बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल 
- बहुतेक आठवडा बाजारांत शुकशुकाट 
- अनेक गावांतील शाळाही राहिल्या बंद 

सातारा - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात पुकारलेला "बंद' एक- दोन किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडला. सातारा शहरात पाच ठिकाणी दगडफेक झाली. याप्रकरणी 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील विविध शहरांत काढण्यात आलेल्या निषेध मोर्चांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. बहुतांश तालुक्‍यांच्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी "रास्ता रोको' केला. गावागावांत मोर्चे काढून घटनेचा निषेध नोंदविला. सातारा शहरातही सकाळी विविध संघटनांनी निषेध मोर्चे काढले. रिपाईचे नेते दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली प्रतापसिंहनगरपासून निषेध मोर्चा काढण्यात आला. सकाळपासून शहरात तुरळक दुकानेच उघडण्यात आली होती. तीही कार्यकर्त्यांनी बंद करायला भाग पाडले. एकंदर "बंद' शाततेत सुरू असतानाही शहरात पाच ठिकाणी दगडफेक झाली. मोळाचा ओढा परिसरात काही कार्यकर्त्यांनी रिक्षाची मोडतोड केली. याप्रकरणी शेखर शिवाजी बनसोडे (रा. पैंजन टाईल्स मागे) याच्यासह 25 ते 30 महिला व युवकांवर गर्दी-मारामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महामार्गालगतच्या हॉटेल प्रीती एक्‍झिक्‍युटिव्हच्या पार्किंगमधील दोन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. शाहूपुरीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेची काच फोडण्यात आली. जुना मोटर स्टॅण्ड परिसरातील शालगर यांच्या रंगाच्या दुकानावर दगडफेक झाली. त्यात दुकानाच्या काचा फुटल्या. कणसे हुंडाई शोरूमजवळही एका तीन चाकी गाडीची काच फोडण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी चार युवकांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. "बंद' काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वत: पोलिस अधीक्षक संदीप पाटील कंट्रोलरूमसह सर्व ठिकाणी लक्ष ठेऊन होते. 

दरम्यान, कोरेगाव भीमा येथील दंगलीत झालेल्या राहुल पठांगडे या युवकाच्या मृत्यू प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

पोलिस ठाण्यासमोर काही काळ तणाव  
मंगळवारी सायंकाळी सदरबझार येथे एसटी बस रोखल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जयवंत वटणे व प्रदीप कांबळे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मिलिंद वसंत ढवळे या एसटी चालकाने तक्रार दिली आहे. युवकांना ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांना सोडून द्यावे, अशी मागणी करत दुपारी एकच्या सुमारास सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर जमाव मोठ्या प्रमाणात जमला. संतप्त जमावाने परिसरात घोषणाबाजी केल्याने पोलिस ठाण्यासमोरही तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वेळी पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन करून पडताळणी केल्यानंतरच ताब्यात घेतलेल्या संशयितांवर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितल्यानंतर जमाव पोलिस ठाण्यासमोरून निघून गेला. 

चारपर्यंत एसटी बंद 
"बंद'च्या पार्श्‍वभूमीवर सकाळी सहा ते सायंकाळी चारपर्यंत जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आजच्या 2204 पैकी 1555 फेऱ्या रद्द झाल्या. त्यानुसार एक लाख तीन हजार 398 किलोमीटरचे अंदाजित 26 लाख 88 हजार 348 रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची प्राथमिक स्वरूपातील माहिती विभाग नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली. 

Web Title: satara news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash