तोरण मारणे स्पर्धेमध्ये ७० बैलांचा सहभाग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

मलवडी -  बिदाल (ता. माण) येथे पारंपरिक वाद्यांचा कडकडाट,  शौकिनांच्या जोरदार आरोळ्यांत बैलांची तोरण मारण्याची स्पर्धा उत्साहात पार पडली. त्यात बिदाल येथील २७ बैलांसह साखरवाडी, झिरपवाडी, सातारा, पुसेगाव, कोरेगाव, कुमठे, लोधवडे, शिंदी, पांगरीसह विविध गावांतील ४३ अशा एकूण ७० बैलांनी सहभाग घेतला होता.

सलग ३६ वर्षांची परंपरा असलेली ही महाराष्ट्रातील एकमेव बैलाने तोरण मारण्याची स्पर्धा आहे. दर वर्षी नागपंचमीच्या दिवशी येथील भैरवनाथ मंदिरात या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली स्पर्धा सायंकाळी सात वाजता संपली. बैलाच्या शिंगात सजविलेले टोप बसवून त्याने तोरण मारण्यात येते. ज्या ठिकाणी तोरण बांधलेले असते तिथे बैलाला पळवत आणण्यात येते व बैल उडी घेऊन शिंगाला झटका देऊन टोपाला असलेल्या दोरीच्या साहाय्याने तोरण मारतो. सुरवातीला १२ फूट उंचीवर तोरण बांधण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या तोरणाची उंची वाढविण्यात आली. उपांत्य फेरीमध्ये २१ बैल पोचले होते. 

अंतिम फेरीत तीन बैल पोचले. स्पर्धेमध्ये १८ फूट उंचीचे तोरण मारून शिवाजी जगदाळे यांच्या बैलाने विजेतेपदासह दहा हजार रुपयाचे बक्षीस पटकाविले. द्वितीय क्रमांकाचे सात हजार रुपयांचे बक्षीस एकता दगडू जगदाळे (बिदाल) व लक्ष्मण जाधव (लोधवडे) यांच्या बैलांना विभागून देण्यात आले, तर तृतीय क्रमांकाचे पाच हजार रुपयांचे बक्षीस १८ बैलांना विभागून देण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बेंदूर समिती बिदाल, बालाजी जगदाळे, शरद जगदाळे, ताराचंद जगदाळे, नंदू पिसाळ, हणमंत फडतरे, पोपट खरात यांच्यासह तरुणांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Web Title: satara news malwadi