वाळू चोर म्हणतात... "भितुय का कुणाला' 

वाळू चोर म्हणतात... "भितुय का कुणाला' 

मलवडी - मागील दोन दिवसांत घडलेल्या घटनांमुळे माणमधील वाळू चोरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेळीच या वाळू चोरांच्या मुसक्‍या न आवळल्यास गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. कारण "भितूय का कुणाला...!' अशी मुजोर भाषा हे वाळू चोर वापरू लागले आहेत. महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्त प्रयत्न करून या वाळू चोरांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज आहे. 

माणमध्ये पळशीपासून देवापूरपर्यंत, तसेच पिंगळी तलाव व माणगंगेला मिळणाऱ्या मोठ्या ओढ्यातून वाळू उपसा सुरू आहे. खरं तर अल्प प्रमाणात व नजरेआड मनुष्यबळाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या वाळू उपशाकडे सर्वच जण डोळेझाक करतात. त्याला शक्‍यतो कोणाची हरकतही नसते; पण जेव्हापासून वाळूच्या या आगाराकडे परजिल्ह्यातील वाळू तस्करांचे लक्ष गेले, तेव्हापासून अमर्याद वाळू उपशाला सुरवात झाली आहे. हे बाहेरील वाळू तस्कर तालुक्‍यातील वाळू चोरांच्या साथीने आपले कार्य साधू लागलेत. विशेषतः स्थानिक वाळू चोरांनी जेसीबी अथवा मशिनच्या साहाय्याने रात्रंदिवस वाळू काढून त्याचा साठा केला जात आहे, तर रात्रीच्या अंधारात हीच वाळू डंपरमध्ये भरून परजिल्ह्यात विक्रीस न्यायची, असा प्रकार सुरू आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी कारवाया केल्या जात आहेत; पण या वाळू तस्करांचे नेटवर्क इतके जबरदस्त आहे, की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हालचाली लगेच त्यांच्यापर्यंत पोचतात. 

म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हसवड, देवापूर, पळशी ही वाळूची खूप मोठी आगारे आहेत. या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होते. दुर्गम भागाचा लाभ घेऊन दिवसाढवळ्या वाळू चोरी केली जात आहे. शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून या वाळू चोरांना कोणा शेतकऱ्याने अटकाव केल्यास "तुला काय करायचे आहे ते कर, आम्ही कुणाला भीत नाही,' अशी मुजोर भाषा हे वाळू चोर वापरत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या या वाळू चोरांची दहशत इतकी असते, की सामान्य शेतकरीच नव्हे तर कोतवाल, पोलिस पाटील सुद्धा त्यांना घाबरताना दिसतो. या वाळू चोरांना शासनातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांची सुद्धा साथ मिळते. त्यामुळेच हे वाळू चोर मस्तावले आहेत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. माणमध्ये यापूर्वी वाळू चोरीच्या कारवाईत एका कोतवालाचा मृत्यू झाला असून, अजून एका कोतवालाच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालण्याचा प्रयत्न केला गेला होता. कालही (ता. 7) असाच जीवघेणा प्रकार घडला. 

ही सर्व परिस्थिती पाहता प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. महसूल विभाग व पोलिसांनी एकत्रित कारवाया करून वाळू तस्करांच्या नाड्या आवळल्या पाहिजेत. कायद्यापुढे कोणी मोठा नाही हे ही दाखवून देण्याची वेळ आली आहे. 

झारीतले शुक्राचार्य शोधावे लागणार 
महसूल विभागाचे अनेक अधिकारी, कर्मचारीच वाळू चोरांना सामील असल्याचा आरोप होत आहे. याबाबत माहिती घेतली, तर काहीच कर्मचाऱ्यांकडून वाळू चोरीविरुद्ध कारवाया केल्या जाताना दिसतात. तर काहींकडून एकही कारवाई होत नाही. जोपर्यंत झारीतले शुक्राचार्य शोधले जाणार नाहीत, तोपर्यंत वाळू चोर मुजोर होणार, हे स्पष्टच आहे. 

पोलिस अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद 
वाळू तस्करांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी महसूल विभागाला पोलिसांची साथ मिळणे महत्त्वाचे असते. त्यातही काही पोलिस ठाण्याचे अधिकारी मदतही करतात; पण काहींची भूमिका संशयास्पद दिसते. माण तालुक्‍यातील एका पोलिस ठाण्याचा अधिकारी वाळू तस्करांना सोडून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच गुन्हेगारासारखी वागणूक देत असल्याचे बोलले जात आहे. वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांना दोन- दोन तास बसवून ठेवले जाते. कर्मचाऱ्यांनी पकडलेली वाहने पोलिस ठाण्याच्या आवारातून पळवून नेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com