शेतकऱ्यांच्या मंडईवर घेवाऱ्यांचा कब्जा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

सातारा - अपघाताची शक्‍यता लक्षात घेऊन सकाळच्या मंडईच्या वेळी आकार हॉटेल ते मुख्य बस स्थानक तसेच खंडोबाचा माळ ते काँग्रेस कमिटी हे दोन रस्ते रहदारीसाठी बंद करावेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी मंडईच्या नावाखाली घेवारींनी रस्त्यावर तळ ठोकला आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या शहरातील मंडई ओस पडत असून, शेतकरी मंडईच्या नावाखाली घेवारींनी रस्त्यावर बाजार मांडला आहे.

सातारा - अपघाताची शक्‍यता लक्षात घेऊन सकाळच्या मंडईच्या वेळी आकार हॉटेल ते मुख्य बस स्थानक तसेच खंडोबाचा माळ ते काँग्रेस कमिटी हे दोन रस्ते रहदारीसाठी बंद करावेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी मंडईच्या नावाखाली घेवारींनी रस्त्यावर तळ ठोकला आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या शहरातील मंडई ओस पडत असून, शेतकरी मंडईच्या नावाखाली घेवारींनी रस्त्यावर बाजार मांडला आहे.

कोणत्याही सुविधा मिळत नसलेल्या बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी भाजी मंडई भरविली जाते. शहराच्या पूर्व भागात मंडई नसल्याने नागरिकांची या मंडईत रीघ असते. स्वस्त व ताजी तरकारी मिळते म्हणून शहरातील नागरिकांचा या मंडईकडे ओढा वाढला आहे. गुरुवार व रविवारी या मंडईत ग्राहकांना व विक्रेत्यांना पाय ठेवायलाही जागा नसते. सकाळी सहा ते दहा या चार तासांत हातोहात माल खपतो. पुन्हा दिवसभर अन्यत्र व्यवसाय करता येतो. त्यामुळे घेवारी लोकांची या मंडईला प्रथम पसंती असते. या मंडईमुळे फळ विक्रेत्यांचाही रस्त्यावर ठिय्या असतो. 

पाच-एक वर्षांपूर्वी डी. बी. कदम मार्केटच्या दारात शेतकरी मंडईसाठी बसत होते.  घेवारी व इतर विक्रेत्यांची संख्या वाढल्यामुळे मुख्य बस स्थानक रस्त्यावर मंडई येऊ लागली. अपघाताची शक्‍यता लक्षात घेऊन प्रसारमाध्यमांनी सातत्याने आवाज उठविल्याने प्रांतांच्या आदेशानुसार ही मंडई बाजार समितीच्या आवारात हलविण्यात आली. आज याही ठिकाणी ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती आहे. 

सकाळी सहापासून दहा ते अकरा वाजेपर्यंत बस स्थानक रस्त्यावरच विक्रेते बसलेले असतात. त्यांचे साहित्य पाठीमागील पदपथावर ठेवलेले असते. बाजार समितीच्या कोपऱ्यापासून जिल्हा सरकारी सेवक पतसंस्थेपर्यंत विक्रेते मुख्य रस्त्यावरच बसलेले असतात. हीच परिस्थिती गणपतराव तपासे मार्गावर गॅस एजन्सीपासून बाजार समितीच्या कोपऱ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळते. विक्रेत्यांना कट्टे नाहीत, की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. डोक्‍यावर छत नाही की, साधा झाडाच्या सावलीचा आसराही नाही. सकाळी उजाडल्यापासून विक्रेते तळपत्या उन्हात बसलेले असतात. 

मंडईपासून होणारा त्रास कोणाला दिसेना?
ऊन-पावसात, जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यात विक्रेत्यांना बसावे लागते. गर्दीचे नियोजन नाही. ग्राहकांना विक्रेत्यांच्या दोन रांगांमधून येण्या-जाण्यासाठी पुरेशी जागा नसते. महिलांची याठिकाणी कुचंबना होते. वरून तळपता सूर्य हा विक्रेते व ग्राहकांची परीक्षाच बघत असतो. पार्किंगची अपुरी सोय, रस्त्यावरून पोलिस वाहन उचलून नेण्याची टांगती तलवार, रस्त्यावरील रहदारीसाठी होणारा अडथळा यांमुळे विक्रेते, शेतकरी, मंडईत जाणारा ग्राहक तसेच रस्त्यावरील वाहतूक या सर्वांच्याच दृष्टीने ही जागा मंडईसाठी गैरसोईची आहे. मात्र, ही गैरसोय कोणालाही दिसून येत नाही की काय ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Web Title: satara news mandai farmer