शिवेंद्रसिंहराजे भोसले हे फेकू आमदार: पवार

प्रवीण जाधव
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

सातारा : युती शासनाच्या माध्यमातून भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंजूर करून आणलेली कामे स्वत:च्या नावावर खपविण्याचा प्रयत्न करणारे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे फेकू आमदार आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला एवढी किंमत असती तर, आघाडी शासनाच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात सातारा-जावळीचे प्रश्‍नच शिल्लक रहायला नको होते, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते दीपक पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

सातारा : युती शासनाच्या माध्यमातून भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंजूर करून आणलेली कामे स्वत:च्या नावावर खपविण्याचा प्रयत्न करणारे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे फेकू आमदार आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला एवढी किंमत असती तर, आघाडी शासनाच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात सातारा-जावळीचे प्रश्‍नच शिल्लक रहायला नको होते, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते दीपक पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

श्री. पवार म्हणाले, विधानसभेतील सर्वात कमी सक्रिय असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे आहेत. पंधरा वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांना सातारचे प्रश्‍न मार्गी लागले नाहीत. सध्या ते विरोधी आमदार आहेत. आमदार फंडाशिवाय त्यांच्याकडे निधी खर्चाचे कोणतेही साधन नाही. असे असताना युती शासनाच्या माध्यमातून सातारा-जावळीच्या विकासासाठी येणारा निधी आपल्यामुळेच आला, असा बेबनाव करून ते जनतेची दिशाभूल करू पाहात आहेत. भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते सातारा-जावळीचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शासकीय स्तरावर कसून प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील या प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. त्यामुळे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी येत आहे. कास रस्त्यासाठी आलेला निधीही त्याचाच भाग आहे. वरील दोन नेत्यांबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही त्यात वाटा आहे.

भारतीय जनता पक्षाचे विकासाला महत्त्व आहे. प्रसिद्धीसाठी काम करत नाही. त्यामुळे केलेल्या प्रत्येक कामाची पेपरबाजी करत नाही. मात्र, युती शासनाने काम केले ही वस्तूस्थिती लपवून आमदार चुकीची माहिती देऊन लोकांची फसवणूक करत आहेत. ते फेकू आमदार आहेत. मुख्यमंत्री सडक योजनेतून सातारा-जावळीतील अनेक रस्त्यांची कामे मंजूर करून घेतली आहेत. मात्र, ती मीच केली असे म्हणत ठेकेदारांना हाताशी धरून दोनदा भूमिपूजनाचा सपाटा लावला जात आहे. सत्तेच्या काळात त्यांना धरणग्रस्तांचा प्रश्‍न मार्गी लावता आला नाही. आत मी महू-हातेघर धरणासाठी निधी आणल्याने त्यांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे त्या धरणाचे काम बंद पाडण्याचे उद्योग त्यांनी केले आहेत. धरणग्रस्तांचा खोटा कळवळा आणून त्यांच्या प्रश्‍नांसाठी मेळावे घेत आहेत. सर्वसामान्य जनतेला हे माहीत आहे. जनता त्यांच्या थापांना भूलणार नाही असेही पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आगामी काळात चिखली, बोंडारवाडी धरणाचा प्रश्‍न मार्गी लावणार आहे. भू-विकास बॅंकेबाबत असलेल्या प्रश्‍नावरही तोडगा काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. सातारा-जावळीच्या विकासाचे काम या दोन नेत्यांच्या माध्यमातून वेगात सुरू असल्याचेही पवार यांनी नमूद केले.

Web Title: satara news mla shivendrasingh raje bhosale deepak pawar