विसर्जनासाठी मोती तळेच! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

सातारा - गणेश विसर्जनासाठी पालिकेने स्वमालकीचे मोती तळेच जवळपास निश्‍चित केले आहे. न्यायालयाच्या निर्देशांनुसार या तळ्यातून दूषित पाणी जलस्त्रोतांत झिरपू नये म्हणून पाण्याखाली प्लॅस्टिकचा कागद टाकला जाणार आहे. 

सातारा - गणेश विसर्जनासाठी पालिकेने स्वमालकीचे मोती तळेच जवळपास निश्‍चित केले आहे. न्यायालयाच्या निर्देशांनुसार या तळ्यातून दूषित पाणी जलस्त्रोतांत झिरपू नये म्हणून पाण्याखाली प्लॅस्टिकचा कागद टाकला जाणार आहे. 

मंगळवार तळे व मोती तळ्यात पूर्वी मूर्ती विसर्जन केले जायचे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी मंगळवार, मोती व फुटके तळ्यात मूर्ती विसर्जनाला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने या तळ्यांत मूर्ती विसर्जन न करण्याचा मनोदय जाहीर केला. गेली चार वर्षे निर्धारपूर्वक पालिकेने शब्द पाळलाही. मात्र कृत्रिम तळ्यासाठी येणारा खर्च जवळपास 40 लाखांपर्यंत जात असल्याने पालिकेने अन्य पर्याय शोधण्यास सुरवात केली. त्यातून शाहू कलामंदिरासमोर, फरासखान्यातील तळ्याचा पर्याय पुढे आला. हे तळे खासगी मालकीचे असल्याने पदाधिकाऱ्यांनी या तळ्याचा नाद सोडून दिला. मंगळवार तळेही राजघराण्याच्या मालकीचे आहे. राजमातांनी या तळ्यात मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध करावा, असे पत्र 2015 मध्ये जिल्हा प्रशासनाला दिले आहे. तेव्हापासून या तळ्यात एकाही मूर्तीचे विसर्जन होत नाही. त्यामुळे मंगळवार तळ्याचा पर्यायही संपुष्टात आला आहे. 

पारंपरिक तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अर्थ लावण्यासाठी पालिकेने वकिलांचा सल्ला घेतला. मोती तळ्यात मूर्ती विसर्जन करू नका, असे कोठेही न्यायालयाने म्हटलेले नाही. अशा तळ्यांत विसर्जन करताना राज्य व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच प्रदूषणांसंदर्भातील मानकांचे पालन केले जावे, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे अंमलबजावणी करत मोती तळ्यात मूूर्ती विसर्जन करण्यास परवानगी देण्याच्या निष्कर्षाप्रत पालिका पदाधिकारी आले असल्याचे समजते. 

सुमारे 60 फूट रुंद व 30 फूट खोलीचे हे मोती तळे आहे. शहरात साधारण 300 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. या सर्व मूर्तींसाठी मोती तळ्याची क्षमता अपुरी पडणार आहे. त्यामुळे पालिकेला विसर्जनस्थळाचा आणखी एक पर्याय शोधावा लागणार आहे. पाच फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींसाठी जलतरण तलाव हा एक पर्याय आहे. मात्र, तरीही मोठ्या मूर्तींसाठी "मोती तळे'अपुरे ठरणार आहे. सार्वजनिक मंडळांनी पाच फुटांपेक्षा छोट्या मूर्ती घेणे, तसेच एकच मूर्ती पाच किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी कायम ठेवणे हा एकमेव चांगला पर्याय आहे. पालिका पदाधिकारी हा पर्याय सार्वजनिक मंडळांच्या गळी उतरविण्यात कितपत यशस्वी होतात, हे लवकरच स्पष्ट होईल. 

- मोती तळ्यात पाण्याखाली प्लॅस्टिकचा कागद टाकला जाईल 
- तळ्यात निर्माल्य व इतर प्रदूषणकारी वस्तूंच्या विसर्जनास प्रतिबंद 
- मंगळवार व मोती तळे पालिकेच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, कलात्मक वारसा यादीत 
- एकाच तळ्यात सर्व मोठ्या मूर्तींचे विसर्जन अशक्‍य 
- पालिकेला पर्यायी व्यवस्था ठेवावी लागणार 

Web Title: satara news moti lake ganesh visarjan