वय लपविणाऱ्या पदाधिकाऱ्यांना चाप

उमेश बांबरे
मंगळवार, 27 जून 2017

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व सेलची पुनर्रचना करून नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यास सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर युवक व विद्यार्थी सेलचे पदाधिकारी निवडताना त्याचे खरे वय समजून यावे म्हणून वयाचा दाखला म्हणून आधार कार्ड सक्तीचे केले आहे. या प्रकारामुळे युवक व विद्यार्थी सेलच्या जुन्या कार्यकर्त्यांत  नाराजी आहे. 

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व सेलची पुनर्रचना करून नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यास सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर युवक व विद्यार्थी सेलचे पदाधिकारी निवडताना त्याचे खरे वय समजून यावे म्हणून वयाचा दाखला म्हणून आधार कार्ड सक्तीचे केले आहे. या प्रकारामुळे युवक व विद्यार्थी सेलच्या जुन्या कार्यकर्त्यांत  नाराजी आहे. 

राष्ट्रवादीत पदाधिकारी निवडताना नेत्यांच्या मर्जीला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे काही वेळेस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. त्याला पदाधिकारी होण्यापासून वंचित राहावे लागते. याबाबत अनेकांच्या तक्रारी गेल्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी निवडीत सुसूत्रता आणण्यासाठी आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला सक्तीचा करण्याची भूमिका घेतली आहे. 

कोणत्याही पदाधिकारी अथवा कार्यकर्त्याने आपले वय दडवू नये म्हणून वयाचा दाखला म्हणून आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यानुसार साताऱ्यात युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीवेळी नेत्यांनी आधार कार्डची मागणी केली. त्यामुळे युवक व विद्यार्थी सेलचे जुने कार्यकर्ते संभ्रमात पडले. राष्ट्रवादीच्या विद्यार्थी सेलसाठी २७ वर्षांपर्यंत, तर ‘युवक’साठी २७ ते ३२ वर्षे वयोगटातील युवकांना संधी दिली जाते. पण, यापूर्वी नेत्यांच्या मर्जीतील युवकांना अध्यक्षपद दिले जात होते. त्याला वयोमर्यादेचे बंधन पाळले जात नव्हते. 

‘युवक’चे कार्यकर्ते पक्षाचे पद घेऊन चमकुगिरी करण्यावरच अधिक भर देऊ लागले. त्यामुळे ‘युवक’ व तसेच ‘विद्यार्थी सेल’चे काम मागे पडले. आता पुन्हा नव्याने निवडी होताना संबंधित कार्यकर्त्याचे वय समजावे म्हणून आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे वयासोबतच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी होता येणार आहे. चमकुगिरी करणारे बाजूला पडणार आहेत. 

वय नको, सामाजिक बांधिलकी बघा!
‘राष्ट्रवादी युवक’ व ‘विद्यार्थी सेल’साठी आधार कार्ड सक्ती केल्यानंतर नेहमी या दोन्ही सेलच्या कार्यक्रम व आंदोलनावेळी त्यांचे कार्यकर्ते पाहुण्यासारखे येऊन कार्यक्रमात सहभागी होतात आणि निघून जातात. कार्यक्रमानंतर सतरंजी व पाण्याच्या फेकून दिलेल्या बाटल्या मात्र जुन्या कार्यकर्त्यांना उचलाव्या लागतात. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाण असलेल्यांना युवक व विद्यार्थी सेलचे पदाधिकारी करा, अशी मागणी जुन्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. 

Web Title: satara news ncp