मोकळ्या खुर्च्यांचे ‘राष्ट्रवादी’ला ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सातारा जिल्हावासीयांतर्फे त्यांचा येत्या १३ नोव्हेंबरला सत्कार करण्यात येणार आहे. या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आयोजित केलेल्या बैठकीस कार्यकर्ते व सदस्यांनी पाठ फिरविली. केवळ प्रतिष्ठेसाठी पक्षाचे पद आणि निवडणुकीच्या तिकिटासाठी पक्ष अशी अवस्था ‘राष्ट्रवादी’ची झाली आहे. यावर नेत्यांनी वेळीच उपाय न केल्यास पक्षाच्या कार्यक्रमास कार्यकर्ते विकत घेण्याची वेळ पक्षावर येण्याची भीती आहे. 

लोकसभा आणि विभानसभा निवडणुकीनंतर केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या पक्षांना विरोधकांची भूमिका बजवावी लागली आहे; पण कायम सत्तेत राहिल्याने त्यांना विरोधकांचीही भूमिका बजावणे अवघड झाले. यातून जिल्हास्तरावर विविध कारणांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेले मोर्चे, आंदोलने असोत किंवा अन्य कार्यक्रम अशा कार्यकर्त्यांची संख्या कमी कमी होताना दिसू लागली.

सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी ‘राष्ट्रवादी’चे प्रत्येक तालुक्‍यात एल्गार मोर्चे सुरू आहेत; पण दोन- चार तालुके वगळता उर्वरित तालुक्‍यांत मोर्चाला कार्यकर्त्यांची उपस्थिती रोडावलेली दिसते. काल खुद्द पक्षाध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीस मोजून शंभर ते दीडशे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे असूनही अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्हापातळीवर विविध पदांवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीस दांडी मारली. निम्म्यापेक्षा अधिक खुर्च्या रिकाम्या राहिल्याने पक्षाचे प्रतोद आणि कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे संतप्त झाले होते. केवळ पदासाठी आणि निवडणुकीसाठी पक्ष हवा, असे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून दूर करा, असा सल्लाही त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना दिला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही केवळ राज्यात सत्ता नाही, म्हणून कार्यकर्ता व पदाधिकारी थोडा अस्वस्थ झाला आहे. कार्यकर्त्यांना आर्थिक हातभार लावण्याकडे पक्षाची नेते मंडळीही कमी पडताना दिसते. त्यामुळे सक्षम विरोधक म्हणून बालेकिल्ल्यातच त्यांची आंदोलने व बैठकांना कार्यकर्त्यांची उपस्थिती जेमतेम होत आहे, तसेच पक्षाचे पदाधिकारी नेमतानाही नेते मंडळी पक्षासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देत नसल्याचे चित्र आहे. याचाच फटका पक्षाच्या बैठकांतील अनुपस्थितीतून जाणवला. आगामी काळात पक्षाचे कोणतेही पद देताना सक्षम, पक्षासाठी वेळ देणारा, अनुभवी कार्यकर्त्यालाच संधी देणे गरजेचे आहे. त्यासोबतच काही प्रमाणात निधीही या पदाधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे, तरच पक्षाची आंदोलने असो वा बैठका गर्दीने फुलून जातील.

Web Title: satara news ncp meeting