टीकेचे धनी झाल्यावर  पोलिसांचा होमवर्क!

सोमवार, 24 जुलै 2017

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांच्या शुक्रवारी रात्रीच्या बिनधास्त ‘रोड शो’ची पोलिसांना चांगलीच धडकी भरली आहे. पोलिसांवर बोटे उठविली जात असल्याने पुन्हा असा प्रकार घडल्यास काय करायचे, त्याचे परिणाम काय होतील, ती परिस्थिती कशी हाताळायची, याचे होमवर्क पोलिसांनी सुरू केले आहे. पुन्हा असे झाल्यास करायचा ॲक्‍शन प्लॅन पोलिस बनवत आहेत.

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांच्या शुक्रवारी रात्रीच्या बिनधास्त ‘रोड शो’ची पोलिसांना चांगलीच धडकी भरली आहे. पोलिसांवर बोटे उठविली जात असल्याने पुन्हा असा प्रकार घडल्यास काय करायचे, त्याचे परिणाम काय होतील, ती परिस्थिती कशी हाताळायची, याचे होमवर्क पोलिसांनी सुरू केले आहे. पुन्हा असे झाल्यास करायचा ॲक्‍शन प्लॅन पोलिस बनवत आहेत.

खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यापासून गेली तीन महिने उदयनराजे साताऱ्यात नव्हते. त्यातच चार दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळला. त्यामुळे उदयनराजे सर्वोच्च न्यायालयात जाणार की अटक होणार, ते साताऱ्यात येणार का, अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यातच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी उदयनराजेंना कधीही अटक होऊ शकते, असे विधान केले होते. त्यामुळे एकूणच काय होणार, याबाबत संभ्रमावस्था होती.  

या सर्वांना शुक्रवारी रात्री उदयनराजेंनी ‘जोर का धक्का’ दिला. शुक्रवारी रात्री साडेनऊपासून उदयनराजेंचा बिनधास्त रोड शो सुरू होता. कार्यकर्त्यांकडून तर दम असेल तर, अटक करा, असे पोलिस दलाला उघड उघड आव्हान दिले जात होते. बराच वेळ हा शो सुरू असताना एरवी शहरातील चौका-चौकांत उभी असणारी, कागदपत्रे तपासणी व हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असलेली पोलिस यंत्रणा कुठेच दिसत नव्हती. 

पोलिस मुख्यालय, शहर पोलिस ठाण्यातही शांतताच होती. पोलिस यंत्रणेच्या अनुपस्थितीचा हा मुद्दा जनतेच्या नजरेतून सुटला नाही. अटकेच्या नुसत्याच वल्गना करणाऱ्या पोलिस दलाला उदयनराजेंच्या एन्ट्रीने आव्हान दिल्याचीच चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. एरवी किरकोळ कारणासाठीही सर्वसामान्य नागरिकाला खाकीच्या धाकाचा सामना करावा लागतो. आता काय झाले, असा प्रश्‍न अनेक जण उपस्थित करू लागले आहेत. 

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही ही गोष्ट गांभीर्याने घेत दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे भाष्य केले. ती होईल ना होईल; पण उदयनराजेंच्या या एन्ट्रीचा धसका पोलिसांनी चांगलाच घेतला आहे. पुन्हा असा प्रकार झाल्यास काय भूमिका घ्यायची, याचे पोलिस दलात जोरदार मंथन सुरू आहे. उदयनराजेंना अटक केल्यास काय होईल, याचा अंदाज घेतला जात आहे. कोणत्या भागातून किती लोक येऊ शकतात, त्यांना कुठे रोखता येईल, कोणते कार्यकर्ते आक्रमक होऊ शकतात, त्यांना कसे रोखायचे, कुणाची मध्यस्थी होऊ शकते का, या सर्व शक्‍यतांवर विचार केला जात आहे. त्यानुसार करायच्या उपाययोजनांचा रोड मॅप तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात झाल्या आहेत. मुख्यालयात कोणत्याही वेळी जादा कुमक उपलब्ध राहील, अशीही आखणी केली जात आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर तंबू उभारण्याचे कामही सुरू झाले आहे.

Web Title: satara news police Udayanraje Bhosale