उन्मत्त सावकारी कधी होणार उद्‌ध्वस्त!

प्रवीण जाधव
शुक्रवार, 21 जुलै 2017

सहा महिन्यांपासून समोर येणाऱ्या एकापेक्षा एक गंभीर स्वरूपाच्या खासगी सावकारीच्या घटनांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. कायद्याचे कोणतेही भय बाळगायला यंत्रणा तयार नसल्याचे पदोपदी जाणवत आहे. खासगी सावकारांची ही साखळी उद्‌ध्वस्त करायचे सोडाच; पण अनेक गुन्हे दाखल झालेल्यांनाही पोलिसांना हात लावता आलेला नाही. पोलिस दलाचे हे अपयशच आहे. त्यामुळे खासगी सावकारीला लगाम घालणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात दहशतीचे थैमान घालणाऱ्या खासगी सावकारीवर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...

फलटण, कऱ्हाड असो वा सातारा, गेल्या सहा महिन्यांत खासगी सावकारांनी केलेले प्रताप सर्वसामान्यांचा थरकाप उडविणारे आहेत. लाखो, कोटींचे व्यवहार व त्यापोटी झालेली पठाणी वसुली! नाडलेल्यांच्या लुबाडलेल्या जमिनी, गाड्या इतकेच काय त्यांच्या कुटुंबाच्या अब्रूवर हात टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यावरून साताऱ्यात कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित झाल्यावाचून राहात नाही. गेल्या सहा महिन्यांत खासगी सावकारीचे अनेक गुन्हे उघडकीस आले. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यात घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. त्यांच्या भूमिकेमुळे किमान गुन्हे तरी दाखल व्हायला लागले. नाही तर खासगी सावकारी विरुद्धचे गुन्हे हे एक प्रकारचे कुरणच बनले होते. मात्र, केवळ गुन्हे दाखल होऊन भागणार नाही. सर्वसामान्यांना प्रकर्षाने जाणवेल, अशा कडक कारवाईची गरज आहे. त्यामध्ये मात्र, पोलिस यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरली आहे.

शहर पोलिसांच्या पुढाकाराने साताऱ्यात खासगी सावकारीचे गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. मात्र, प्रत्येक गुन्ह्यात असलेला मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. लाखो, कोट्यवधी रुपये सावकारीने देणाऱ्यांची साखळीही समोर आलेली नाही. खंड्याच्या नावावर, जिवावर अनेक लुंगेसुंगेही साताऱ्यात सावकार बनून फिरत होते. आजही फिरतात. मात्र, त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यात पोलिस यंत्रणेला अपयश आले आहे. त्यामुळे एकीकडे गुन्हे दाखल होत असताना दुसरीकडे वसुलीच्या मोहिमा सुरूच आहेत. आढाव कुटुंब बेपत्ता झाल्याचे प्रकरण तर साखगी सावकारीचा भयावह चेहरा प्रकर्षाने समोर आणत आहे. या कुटुंबाचा शोध घेऊन त्याला जबाबदार असलेल्या सावकारांना ठेचण्याचे आव्हान पोलिस दलासमोर आहेच. मात्र, असे अनेक आढाव आज जिल्ह्यात विविध ठिकाणी खासगी सावकारीने कर्ज घेतल्याने मरण यातना भोगत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होत आहे. अनेकांच्या जमिनी, इतर स्थावर मालमत्ता जबरदस्तीने लुबाडल्या गेल्या आहेत. तक्रार देण्याचे धाडस त्यांच्यात होत नसल्याने मड्याच्या टाळूचे लोणी खाणारे मदमस्त झाले आहेत. 

या सर्वाला पोलिस यंत्रणेतील महाभागही तितकेच जबाबदार आहेत. जिल्ह्यातील छोट्यातला छोटा खासगी सावकार पोलिस दलाला माहीत नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल. अनेक जण त्यांचे लाभार्थी आहेत. त्यामुळे अनेकदा तक्रारदाराला मिटवून घ्यावे लागते किंवा तक्रार नोंदविण्याचा नाद सोडावा लागतो. आर्थिक पिळवणूक झालेला तक्रार करण्याचा विचारही करू शकत नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यातील अनेक ठिकाणची आहे. अधिकारी मात्र आपल्याकडे तक्रारी कधी येतात याचीच वाट पाहात असल्याचे दिसत आहे. तक्रारी नाहीत म्हणून संबंधित अधिकारी सुस्तावलेत, तर आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाही म्हणून सावकार मस्तावले आहेत. सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, उद्योजक तर आहेच, मात्र या सावकारांचा विळखा सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, नगरपालिका, तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांभोवतीही आवळत चालला आहे. त्यामुळे या प्रवृत्तींना लगाम घालण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पोलिस दलाचा हातोडा निर्दयीपणे खासगी सावकारांच्या सर्वच यंत्रणेवर चालणे आवश्‍यक आहे.

Web Title: satara news Private moneylenders