कुठेही करा वाहन परवान्यात दुरुस्ती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सातारा - "सारथी 4' ही संगणकीय प्रणाली स्वीकारल्यामुळे राज्यातील सर्व वाहन परवान्यांची (लायसन्स) माहिती प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला उपलब्ध होत आहे. त्यामुळे "ना हरकत' दाखल्याशिवाय कोणत्याही जिल्ह्यातून आता परवान्याचे नूतनीकरण व इतर बदल करता येणार आहेत. 

सातारा - "सारथी 4' ही संगणकीय प्रणाली स्वीकारल्यामुळे राज्यातील सर्व वाहन परवान्यांची (लायसन्स) माहिती प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला उपलब्ध होत आहे. त्यामुळे "ना हरकत' दाखल्याशिवाय कोणत्याही जिल्ह्यातून आता परवान्याचे नूतनीकरण व इतर बदल करता येणार आहेत. 

उपप्रादेशिक परिवहन विभागाचे जवळपास संपूर्ण कामकाज ऑनलाईन झाले आहे. "सारथी 4' प्रणालीवर वाहन परवानाधारकांची सर्व माहिती भरण्यासाठी मागील महिन्यात नवीन परवाना व नूतनीकरणाची प्रक्रिया काही दिवस बंद होती. आता ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे 2005 नंतर काढलेल्या परवान्याची व त्यानंतर नूतनीकरण केलेल्या सर्व परवान्यांची ऑनलाइन माहिती सर्व परिवहन कार्यालयात उपलब्ध आहे. 

अनेकांनी नोकरीनिमित्त बाहेर असताना त्याठिकाणी परवाना काढलेला असतो. मूळ जिल्ह्यात परवाना काढल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात स्थायिक झालेलीही अनेक जण आहेत. अशांना नूतनीकरण, नाव व पत्त्यात बदल अशा प्रक्रियांसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागात जावे लागत होते किंवा त्या कार्यालयाचा "ना हरकत' दाखला आणावा लागत होता. याचा विचार करून उपप्रादेशिक परिवहन विभागाने अध्यादेश काढला आहे. 2005 नंतर काढलेले किंवा नूतनीकरण केलेल्या परवान्याचे पुढील नूतनीकरण, तसेच नाव व पत्ता बदल अशा बाबी "ना हरकत' परवान्याशिवाय करण्यास मान्यता दिली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने परवानाधार घरूनही अर्ज करणे, कागदपत्र अपलोड करणे व शुल्क भरण्याची प्रक्रिया करू शकतात. 

परिवहन विभागाच्या नव्या आदेशानुसार "ना हरकत' दाखल्याशिवाय कोणत्याही जिल्ह्यातील वाहन परवान्याचे नूतनीकरण करता येईल. सातारा कार्यालयातही ही सुविधा उपलब्ध आहे. 
- संजय धायगुडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा 

Web Title: satara news Repair of any vehicle license anywhere