चर्चा नाही करायची, तर सभा कशाला? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सातारा - सभागृहात विषयांवर चर्चा झाली पाहिजे, तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्हीच विषय मंजूर करणार असाल, तर पालिका सभा कशासाठी घ्यायची? 40 वर्षे सभागृहात असे कधी घडत नव्हते. ते आता होत आहे, असा घाणाघात नगरविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केला. तरीही सत्ताधारी सातारा विकास आघाडीने बहुमताच्या रेट्यावर 34 पैकी तब्बल 32 विषय मंजूर करून घेतले. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या रिक्‍त पदांवर वारसा हक्‍काने नियुक्‍ती देण्याला स्थगिती देत समिती नेमण्याचा निर्णय झाला. 

सातारा - सभागृहात विषयांवर चर्चा झाली पाहिजे, तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्हीच विषय मंजूर करणार असाल, तर पालिका सभा कशासाठी घ्यायची? 40 वर्षे सभागृहात असे कधी घडत नव्हते. ते आता होत आहे, असा घाणाघात नगरविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केला. तरीही सत्ताधारी सातारा विकास आघाडीने बहुमताच्या रेट्यावर 34 पैकी तब्बल 32 विषय मंजूर करून घेतले. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या रिक्‍त पदांवर वारसा हक्‍काने नियुक्‍ती देण्याला स्थगिती देत समिती नेमण्याचा निर्णय झाला. 

नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ होऊन प्रथम ता. 2 नोव्हेंबर 2017 च्या सभेतील कार्यवृत्तांत कायम करण्याचा विषय मांडण्यात आला. त्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ही सभा रद्द करण्याचे पत्र दिले असतानाही सभा घेतली. सत्ताधारी असल्याने बहुमताने विषय मंजूर करायचे असतील, तर सभाच कशाला घ्यायची? जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाचे वाचन केले जावे, अशी मागणी श्री. मोनेंनी केली. त्यावर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी अहवाल वाचन करणे संयुक्‍तिक ठरणारे नसून, तो सदस्यांना दिला जाईल, असे सांगितले. यावर मतदान घेत "साविआ'ने तो 20 विरुद्ध 14 असा बहुमताने मंजूर केला. 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शहरातील प्रमुख तीन रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याच्या मुद्यावर हे रस्ते करताना पाणीपुरवठा, वीज, टेलिफोन विभागांचा विचार झाला नसल्याचे श्री. मोनेंनी समोर आणले. सध्याच्या रस्त्यांना तीन वर्षे ठेकेदार देखभाल करणार असतानाही पालिकेचे पैसे वाया घालविले जात असल्याचे सांगितले. त्यावर दत्तात्रय बनकर म्हणाले, ""शहराच्या भौगोलिक रचनेनुसार कायमस्वरूपी चांगले रस्ते होण्यासाठी हा प्रस्ताव पाठविणे आवश्‍यक आहे. सदस्यांच्या सूचनांनुसार सर्वंकष विचार केला जाईल.'' 

रस्ते डांबरीकरण, कॉंक्रिटीकरणासाठी आलेले तीन कोटी रुपये सत्ताधारी आणि भाजपने वाटून घेत नविआला दिले नसल्यावरून श्री. मोनेंनी विरोध केला. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी तुम्हाला बजेटमध्ये मंजुरी दिली आहे, असे सांगितले. त्यावर "मंजूर करून ठेवलेल्या विषयांचे पालिकेत ढीग लागले असतील, अशी खिल्ली मोनेंनी उडविली. मार्चअखेरपर्यंत या निधीतून कामे करून घेणे महत्त्वाचे असून, पुढील अनुदानातून तुमची कामे घेऊ, असे सांगत निशांत पाटील यांनी विषय मंजूर करून घेतला. काही बदल सुचवत शहराच्या नवीन वाहतूक आराखड्यास मंजुरी देत असतानाच प्रेक्षा गॅलरीतील शहर सुधार समितीच्या सदस्यांना पर्यावरणपूरक आराखडा द्या, चालण्यासाठी पदपथ द्या, अशी मागणी करत घोषणाबाजी केली. दरम्यान, 25 विषय मंजूर झाल्यानंतर नगराध्यक्षांनी पिठासन अधिकारीपदाचा कार्यभार उपाध्यक्ष राजू भोसले यांच्याकडे सोपविल्यानंतर त्यांनी पुढील कामकाज पाहिले. 

पोलिस बंदोबस्तात सभा 
गत सभेत नगरसेवक लेवे व मोने यांच्यात धक्काबुक्की झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर महिला सदस्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भाजपच्या सिद्धी पवार यांनी सभेला पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. यामुळे पोलिस बंदोबस्तात सर्वसाधारण सभा झाली. 

मोने, लेवेंचे "मिले सूर...' 
वसंत लेवे व अशोक मोने यांच्यात बाचाबाची, धक्काबुक्कीने मागील सभा चांगलीच गाजली. या सभेत मात्र "मैं मैं... तू तू'चे रूपांतर "मिले सूर...' सारखेच दिसून आले. दरम्यान, धनंजय जांभळे यांनी "तुम्ही नगरसेवकांना विश्‍वासात घेत नसल्याने मागचा इतिहास पुन्हा होईल,'असे वक्‍तव्य केले. त्यावर लेवेंनी "मागचा इतिहास माहिती करून घ्या, पूर्वीच्या नगराध्यक्षांनी शिपायांना सांगून नगरसेवकांना बाहेर काढले आहे,' असे सुनावले. राजू भोसलेंनी चांगल्या विषयाला खोडा घालून विरोध करू नका. सर्वांच्या विचारातून हा निर्णय घेतला आहे, असे सांगितल्याने वाद मिटला. 

...हे प्रमुख ठराव मंजूर 
मुख्य तीन रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण 
खुल्या जागा पालिकेकडे हस्तांतरित करणे 
शहापूर पाणीपुरवठा योजनेत पंप बसविणे 
अग्निशमन यंत्रणेत तीन नवीन वाहने घेणे

Web Title: satara news satara municipal