विरोधकांचा "साविआ'वर हल्लाबोल 

satara municpal meeting
satara municpal meeting

सातारा - अजेंडा बदलल्याचा आरोप करत विरोधकांनी सातारा विकास आघाडीला धारेवर धरले. शाब्दिक खडाजंगी, वैयक्तिक शेरेबाजीतून सुरू झालेल्या गोंधळामुळे सत्ताधारी "साविआ' व विरोधी "नविआ' आणि भाजप सदस्यांत चांगलीच जुंपली. सत्तेचा गैरवापर करत विषय पत्रिका परस्पर बदलली जात असल्याचा आरोप झाला. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीतच सत्ताधाऱ्यांनी अवघ्या दहा मिनिटांत 18 विषय मंजूर करून सभा गुंडाळली. 

छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सभा सुरू झाली. तत्पूर्वी नगर विकास आघाडी आणि भाजपच्या सदस्यांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या देऊन निषेधाच्या घोषणा देण्यास सुरवात केली. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांची सही झालेला अजेंडा कोणाच्या दबावातून बदलला. वॉर्डात पडेल ठरलेले नगरसेवक पालिका चालवत असतील तर अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा आशा पंडित यांनी देत नगराध्यक्षांनी लेखी खुलासा द्यावा, अशी मागणी केली. या वेळी अशोक मोने, अमोल मोहिते, दीपलक्ष्मी नाईक, भाजपचे गटनेते मिलिंद काकडे, सिद्धी पवार, धनंजय जांभळे, सागर पावशे, विजय काटवटे, नविआचे शकील बागवान आदी सदस्य आंदोलनात उपस्थित होते. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी "केबिन'मध्ये बसून चर्चा करू, असे आश्‍वासन दिले. मात्र, गोंधळ वाढतच गेला. उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, सभागृह नेत्या स्मिता घोडके यांनाही विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. श्रीकांत आंबेकर यांनी सभागृहात चर्चा करू अशी विनंती केली. मात्र, गोंधळ सुरूच राहिल्याने शेवटी पोलिसांना पाचारण केले. 15 मिनिटांच्या कालावधीनंतर सत्ताधारी पुन्हा सभागृहात दाखल होताना विरोधक आणि सत्ताधारी यांची सभागृहाच्या प्रवेशद्वारावर गर्दीमुळे जोरदार रेटारेटी झाली. 

सातारा विकास आघाडीने विरोधकांच्या गोंधळाचा फायदा उठवत दहा मिनिटांत 18 विषय मंजूर करून सभा गुंडाळली. तत्पूर्वी सिद्धी पवार, अशोक मोने, आशा पंडित यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. अजेंड्याचे विषय कोणाच्या राजकीय दबावातून बदलले गेले याचा खुलासा करण्याची मागणी केली. आशा पंडित यांनी त्यांच्या वॉर्डातील एका नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अतिक्रमणाचा विषय लावून धरला आणि माची पेठेतील रिटेनिंग वॉलचा विषय का रद्द केला. अशी विचारणा केली. झारीतील शुक्राचार्य उदयनराजे यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप पंडित यांनी केला. सिद्धी पवार म्हणाल्या, की पालिकेच्या सभागृहात पोलिस येतात म्हणजे आपण काहीतरी चुकीचे करतोय अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत आहे. यावरून पुन्हा गोंधळाला सुरवात झाली. अशोक मोने व ऍड. दत्ता बनकर यांच्यातही सभागृहात विषय पत्रिकेवर खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी करायचा की सभा सचिवांनी यावर जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांच्या या गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळली. 

न्यायालयाचे दरवाजे  ठोठावणार : अशोक मोने 
सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची राजकीय मुस्कटदाबी चालविली आहे. अजेंड्यावरील विरोधकांचे विषय डावलणे आणि वादग्रस्त विषय अजेंड्यावर आणून गैरमार्गाने आर्थिक लाभ मिळवणे ही सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे. पालिकेच्या इतिहासात इतक्‍या खालच्या थराला कधीच कारभार गेला नव्हता. या सर्व प्रकरणांच्या विरोधात आपण रीतसर न्यायालयात खासगी खटला दाखल करणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. मोने म्हणाले, ""सातारा विकास आघाडीने आजची सभा बहुमताच्या जोरावर गुंडाळली. सत्ताधारी हम करे सौ कायदा या आविर्भावात वावरत असून, विरोधकांची कोणतीही कामे त्यांना होऊ द्यायची नाहीत. आमची कामे होणारच नसतील तर पालिकेत येऊन फायदा काय? आपली बाजू मांडण्याच्या अधिकाराला सत्ताधारी बहुमताच्या जोरावर दाबून टाकतात. उद्धटपणे सभेच्या कामकाजात विरोध करायचा आणि विरोधकांचे विषय डावलायचे यातच त्यांना स्वारस्य आहे. अद्यापही सातारा पालिकेचे बजेट मंजूर नसताना आर्थिक लाभाचे लाखो रुपयांचे विषय गैरमार्गाने अजेंड्यावर आणले जातात.'' 

सातारकरांच्या पैशातून जर कोणाची तुंबडी भरली जात असेल, तर त्याला आमचा सक्‍त विरोध राहील. सातारा विकास आघाडीच्या या भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मोने यांनी दिला. गोडोलीतील महाविद्यालय परिसरातील पोलिस चौकीचे काम एका पडेल वकिलाच्या दबावातून बंद पाडण्यात आल्याचा आरोप शेखर मोरे यांनी केला. या वेळी अमोल मोहिते, रवींद्र ढोणे, शकील बागवान भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com