शंभूराज देसाईंना मंत्रिपदाचे वेध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सातारा - शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्यावर आतापर्यंत टाकलेल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थानिक आमदारांना संधी दिली जावी, हा निकष धरल्यास देसाईंना मंत्रिपदावर संधी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने त्यांनी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. 

सातारा - शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्यावर आतापर्यंत टाकलेल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थानिक आमदारांना संधी दिली जावी, हा निकष धरल्यास देसाईंना मंत्रिपदावर संधी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने त्यांनी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. 

शंभूराज देसाई हे आजपर्यंत पाटण तालुक्‍यापुरते सीमित राहिले. नियोजन समिती असो, की दुष्काळी नियोजन बैठक असो, आमदार देसाई यांचा पाटण तालुक्‍याशी संबंधित प्रश्‍नाला प्राधान्य देण्याकडे कल राहिला आहे. जिल्हा व जिल्ह्याचा विकास याकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. त्याचे कारणही ते स्वतः सांगतात. शिवसेना कार्याध्यक्षांकडून मला जिल्ह्यात लक्ष घालण्यासाठी जबाबदारी आणि सूचना आजपर्यंत आलेली नाही. त्यामुळे ते पाटण तालुक्‍यापुरते सीमित राहणे पसंत करत आहेत, असे ते सांगतात. आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळण्यासाठी श्री. देसाई यांच्याकडून अप्रत्यक्षपणे प्रयत्न सुरू आहेत. नुकताच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकनेते बाळासाहेब देसाईंबाबतच्या वक्तव्याविषयी खेद व्यक्त केला आहे. या खेदातून त्यांनी आपले आजोबा राजकारणातील पदांसाठी हपापलेले नव्हते. त्यांच्यासोबत त्याकाळी काँग्रेसचे सर्व आमदार होते. आमदारांकडून मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब देसाईंच्या नावावर शिक्कामोर्तब होऊनही केवळ यशवंतराव चव्हाण यांचा शब्द पाळण्यासाठी त्यांनी माघार घेतली. चव्हाण आणि देसाई यांचे शेवटपर्यंत चांगले संबंध होते, असे सांगत शंभूराज देसाई यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना आव्हान दिले आहे.  या निमित्ताने आमदार देसाई चर्चेत आले आहेत. ही चर्चा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापर्यंत जावी आणि त्यांच्याकडून दखल घेतली जावी, हाही उद्देश त्यामागे असू शकतो. त्यातून मंत्रिमंडळात स्थान मिळविण्याची जोडणी होणार आहे. आपण स्वाभिमानी असून कोणतीही बाब मागे लागून घेण्यात रस नसल्याचे शंभूराज सांगत असले, तरी मनातून ते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे दिसते. आता या निमित्ताने ते आक्रमक झाले आहेत. 

यापुढे जाऊन त्यांनी आपल्याला शिवसेना कार्याध्यक्षांकडून महत्त्वाची जबाबदारी दिली गेल्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादीची एकाधिकारशाही मोडीत काढली जाईल, असे थेट आव्हान त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे. त्यांची ही सारी विधाने ही काहीशी आक्रमक भूमिकेत असल्याचे दर्शवतात, असे राजकीय जाणकारांना वाटते. देसाईंची ही बदललेली भाषा आणि आक्रमकता त्यांना मंत्रिपदापर्यंत घेऊन जाणार का, याचीच उत्सुकता आता आहे.

पालकमंत्र्यांच्या पाठीशी ठाम
पालकमंत्री विजय शिवतारेंच्या कार्यपद्धती व संपर्काविषयी शिवसेनेतील बहुतांश पदाधिकारी नाराजी व्यक्त करत असले तरी शंभूराज देसाई मात्र शिवतारेंची पाठराखण करत असल्याचे चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीसह विविध शासकीय बैठकांमध्ये त्यांनी सातत्याने पालकमंत्र्यांची बाजू घेतलेली दिसते.

Web Title: satara news shambhu raje desai shiv sena