आमदार शिवेंद्रसिंहराजे उच्च न्यायालयात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

सातारा - सुरुची बंगल्याबाहेर झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांतून वगळण्याची मागणी करणारा अर्ज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. आमदार समर्थकांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर 27 ऑक्‍टोबरला सुनावणी होणार आहे, तर दुसऱ्या गुन्ह्यात अटक केलेल्या चार आमदार समर्थकांना चार दिवसांची पोलिस कोठडी, तर पहिल्या गुन्ह्यात अटक केलेल्या सात खासदार समर्थकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सुरुची बंगल्याबाहेर आमदार व खासदार समर्थकांमध्ये धुमश्‍चक्री झाली. याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीनुसार व अजिंक्‍य मोहिते याच्या फिर्यादीनुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे व त्यांच्या समर्थकांवर खुनाच्या प्रयत्नांचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जयेंद्र चव्हाण, फिरोज पठाण, बाळू ऊर्फ विनोद खंदारे व विक्रम पवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत. त्यावर आज सुनावणी होती. मात्र, सरकार पक्षाच्या वतीने म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागण्यात आली. त्यावर संशयितांच्या वतीने तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळण्याची मागणी केली. त्याला सहायक सरकारी वकील मिलिंद ओक यांनी विरोध दर्शविला. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश चव्हाण यांनी अर्जावरील सुनावणी 27 ऑक्‍टोबर रोजी ठेवली. त्या दिवशी सरकार पक्षाला म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन्ही गुन्ह्यांतून वगळण्याची मागणी उच्च न्यायालयात केली आहे. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ व अजिंक्‍य मोहिते या दोघांच्या फिर्यादीत माझे नाव आहे. मात्र, निरीक्षकांच्या फिर्यादीमध्येच खासदार उदयनराजे भोसले सुरुची बंगल्यावर आले. त्वेषाने आत शिरण्याचा प्रयत्न केला. आम्ही रोखत असतानाच गोळीबाराचा आवाज झाला. त्यानंतर त्यांना गाडीत बसविले व त्यांच्यासोबत जाणाऱ्या गाड्यांच्या धडकेत मी व पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे म्हटले आहे. या घटनेत माझा कोणताही संबंध नाही, तसेच अजिंक्‍य मोहितेच्या फिर्यादीतील मजकुराशीही माझा संबंध नाही. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यातून वगळावे, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली आहे. यावर दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. 

खासदार समर्थक न्यायालयीन कोठडीत 
दुसऱ्या गुन्ह्यात अटक केलेल्या हर्षल चिकणेसह चार आमदार समर्थकांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पहिल्या गुन्ह्यात पोलिस कोठडीची मुदत संपलेल्या माजी नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांच्यासह सात खासदार समर्थकांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: satara news shivendra singh raje high court