शिवसेना कार्यकारिणीत साताऱ्याचे पाच पांडव! 

शिवसेना कार्यकारिणीत साताऱ्याचे पाच पांडव! 

सातारा - शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना नेतेपदी सातारा जिल्ह्यातील दोघांना संधी देत बढती मिळाली आहे. तर उपनेतेपदी दोघांना संधी मिळाली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याला झुकते माप दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात सर्वच मतदारसंघांत तुल्यबळ उमेदवार शोधावे लागणार आहेत. 

शिवसेनेने संपूर्ण देशभर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या उमेदवारांविरोधात शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, या तर्कवितर्कांना सुरवात झाली आहे. सध्यातरी त्यांच्याकडे हक्काने नाव घेण्यासारखा कोणीही उमेदवार नाही. तरीही आगामी वर्षभरात पक्षबांधणी आणि विस्तार करताना त्यांना सक्षम उमेदवार शोधण्यासाठी वेळ मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कायकारिणीच्या निवडीमध्ये जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे शंभूराज देसाई हे एकमेव आमदार आहेत. यापूर्वी जिल्ह्यात शिवसेनेचे फलटणमधून हिंदुराव नाईक-निंबाळकर हे खासदार झालेले होते. तर जावळीतून सदाशिव सपकाळ हे आमदार झाले होते. 

अशा पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जिल्ह्यातील चौघांचा समावेश केल्यामुळे शिवसेनेची जिल्ह्यात ताकद वाढविण्याकामी हे बदल महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद देण्यासोबतच पक्षाची बांधणी करण्यासाठी या सर्वांचा हातभार लागणार असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांत समाधानाचे वातावरण आहे. 

राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरेंसोबत जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, लोकसभेतील गटनेते आनंदराव अडसूळ यांची तर उपनेतेपदी नितीन बानुगडे-पाटील आणि विठ्ठलराव गायकवाड या दोघांना संधी दिली आहे. तसेच पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून जावळीतील दगडू सपकाळ यांची नियुक्ती झाली आहे. मंत्री शिंदे हे महाबळेश्‍वर तालुक्‍यातील दरे येथील असून, त्यांचा या निमित्ताने जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. 

लोकसभेतील गटनेते खासदार आनंदराव अडसूळ हे कोरेगाव तालुक्‍यातील शिरंबे येथील असून, त्यांचाही जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. सातारा तालुक्‍यातील निसराळे येथील विठ्ठलराव गायकवाड हे कामगार नेते असून, बॉम्बे इलेक्‍ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस व महाराष्ट्र मेट्रो कामगार युनियनचे संस्थापक आहेत. त्यांना शिवसेनेच्या उपनेतेपदी संधी देण्यात आली आहे. तर विद्यमान जिल्हा संपर्कप्रमुख आणि उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनाही पुन्हा उपनेतेपदी संधी दिली गेली आहे. तसेच महाबळेश्‍वर तालुक्‍यातील बानवडी तर्फ आहिर येथील दगडू सपकाळ यांना पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. यापूर्वी मुंबईतून ते सलग दोन पंचवार्षिक लालबाग-परळचे आमदार होते. त्यांनी उदयनराजेंच्या विरोधात साताऱ्यातून लोकसभेची तर त्यानंतर सातारा-जावळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. 

आता या दिग्गजांना शिवसेनेतील नेतेपद मिळाल्याने त्यांचा जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यासाठी उपयोग होणार आहे. यातूनच पुढे सक्षम व राष्ट्रवादीला टक्कर देणारा उमेदवार शिवसेना देऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com