विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून दिसला आनंद नवनिर्मितीचा 

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून दिसला आनंद नवनिर्मितीचा 

सातारा - शिक्षण घेत असतानाच घेतलेल्या ज्ञानातून परप्युम, लिक्विड सोपसह चवदार, पौष्टिक बिस्किटे, शोभिवंत फळे, बियाणांचे आकर्षक दागिने, तसेच लोणची आणि चविष्ट चॉकलेट तयार करून त्यांचे प्रदर्शन येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी भरविले. उद्‌घाटनापूर्वीच हे पदार्थ अन्‌ वस्तू खेरदीसाठी झुंबड उडाली आणि बघता बघता प्रदर्शन गर्दीने भरून गेले. हे सारे अनुभवताना ‘वायसी’च्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आज निर्मितीचा आनंद ओसंडून वाहत होता. ‘वायसी सायन्स एक्झिबिशन’ला पालकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला.

यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या वतीने महाविद्यालयाच्या आवारात विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थ, शोभेची झाडे, गणिती आणि कॉम्प्युटर गेम्स अशा वस्तू आणि पदार्थांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन आज ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, उपप्राचार्य डॉ. एच. व्ही. देशमुख, प्रदर्शनाचे समन्वयक डॉ. एच. पी. उमाप, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कॉम्प्युटर सायन्स, फूड सायन्स, बायोटेक्‍नॉलॉजी, केमिस्ट्री अशा विविध विभागांतून विद्यार्थ्यांना ज्ञान दिले जाते. या विज्ञान तंत्रज्ञानातूनच पुढे तंत्रज्ञ, संशोधक विविध वस्तू, पदार्थ आणि ज्ञानाची निर्मिती करत असतात. विद्यार्थ्यांना या ज्ञानाचा विद्यार्थिदशेतच प्रत्यक्ष उपयोग करून सुंदर, आकर्षक वस्तू आणि पदार्थ तयार करता आले पाहिजेत,  मिळालेल्या ज्ञानातून स्वावलंबी होता आले पाहिजे यावर महाविद्यालयात नेहमी भर दिला जातो. त्यासाठीच हे प्रदर्शन आयोजित केल्याची माहिती प्राचार्य डॉ. कानडे यांनी दिली. 

विद्यार्थ्यांनी फिनेल, लिक्विड सोप, हॅंड वॉश, विविध प्रकारचे परफ्युम्स, इकोप्रेंडली बॅग्ज, ऑरगॅनिक फर्टिलायर्स, दर्जेदार गांडूळखत, शोभिवंत फळा फुलांची झाडे, पौष्टिक बिस्किटे, चिक्की, चॉकलेटस, स्नॅक्‍स, ॲक्‍वेरियम, गणिती व कॉम्प्युटर गेम्स, इमिटेशन ज्वेलरी, थ्रीडी प्रिंटिंगच्या शोभिवंत वस्तू अशा शेकडो प्रकारच्या वस्तू आणि पदार्थ स्वतः तयार करून प्रदर्शनात मांडल्या होत्या. त्यास विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभर नागरिकांची गर्दी कमी झाली नव्हती. बघताबघता विद्यार्थ्यांच्या श्रमातून आणि ज्ञानातून तयार झालेल्या वस्तू हातोहात खपू लागल्या. या प्रतिसादाने त्यांचा उत्साह आणि आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. 

विद्यार्थ्यांचे कौतुक करताना श्री. कात्रे म्हणाले, ‘‘हे प्रदर्शन युवकांना प्रोत्साहन देणारे आहे. या स्टार्टअप आणि मेक इन इंडियाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करत राहावे. रयत शिक्षण संस्था अशा मुलांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत राहील.’’ डॉ. पाटील म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांत गुणवत्ता असतेच. त्याना फक्त प्रोत्साहन आणि सुविधा देण्याची गरज आहे. त्यांच्या प्रगतीसाठी ‘रयत’ असे उपक्रम सतत राबवत राहील.’’ प्राचार्य डॉ. कानडे यांनी उपक्रमाचा उद्देश सांगितला. प्रदर्शन उद्या (शुक्रवार) दुपारपर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रा. डॉ. उमाप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com