साताऱ्यात मेंढरांप्रमाणे विद्यार्थ्यांची वाहतूक!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

सातारा - शहर वाहतूक पोलिस शाखेतर्फे गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात वाहनांची तपासणी, वाहनधारकांचा परवाना तपासणे, फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई अशा वेगवेगळ्या मोहिमा राबविल्या जात आहेत. हे करताना वाहतूक शाखा मात्र, अक्षरशः मेंढरांप्रमाणे सुरू असलेल्या विद्यार्थी वाहतुकीकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. 

शहरातील मोजक्‍याच संस्था, शाळा व्यवस्थापनाकडे स्वतःच्या स्कूल बस आहेत. तर उर्वरित शाळांमध्ये भाडे तत्त्वावर घेतलेल्या अथवा खासगी वाहतूकदारांद्वारे विद्यार्थ्यांची ने-आण होत असते. त्यातील काही स्कूल बसमध्ये बिनदिक्कतपणे क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. काही बसमध्ये, तर विद्यार्थ्यांना केबिनमध्ये बसविले जात आहे. बहुतांश शाळांमधील विद्यार्थी रिक्षांमधूनही शाळेत येत असतात. या रिक्षा देखील मेंढरांप्रमाणे विद्यार्थी वाहतूक करीत आहेत. क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक होत असली तरी अद्याप शहरात एकही अपघात घडलेला नाही ही सर्वांसाठी सुदैवाची गोष्ट आहे. मात्र, वेळ काही सांगून येत नाही. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांनी, तसेच पालकांनी वाहनांमध्ये जादा विद्यार्थी असू नयेत, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक पोलिसांनी नित्यनेमाने आपले कर्तव्य पार पडल्यास तसेच स्कूल बस धोरण-२०११ ची अंमलबजावणी करण्यात शाळा व्यवस्थापन, स्कूल बस चालक-मालकांनीही पुढाकार घेतल्यास सर्वांचाच प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.

वाहन तपासणीदरम्यान क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी व्यावसायिकांना आवश्‍यक सूचना करून वेळप्रसंगी कारवाई केली जाते.
- वाय. एस. हांडे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: satara news student transport dangerous