माहेरवाशिणीच्या कर्तृत्वाचा अभिमान

सुनील शेडगे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

नागठाणे - ‘स्वाती ही मुळातच जिद्दी होती. तितकीच ती मेहनती होती. अगदी बालपणापासून तिच्या या स्वभावाचा प्रत्यय वेळोवेळी येत गेला. आज तिने आमचा विश्वास सार्थ ठरविला, याचा विलक्षण अभिमान वाटतो,’ अशा शब्दांत लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या कुटुंबीयांनी आपली भावना व्यक्त केली.

नागठाणे - ‘स्वाती ही मुळातच जिद्दी होती. तितकीच ती मेहनती होती. अगदी बालपणापासून तिच्या या स्वभावाचा प्रत्यय वेळोवेळी येत गेला. आज तिने आमचा विश्वास सार्थ ठरविला, याचा विलक्षण अभिमान वाटतो,’ अशा शब्दांत लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या कुटुंबीयांनी आपली भावना व्यक्त केली.

हुतात्मा संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती या काल सेना आयुध कोअर (आर्मी ऑर्डनन्स) मध्ये लेफ्टनंट या पदावर रूजू झाल्या. भरतगाव (ता. सातारा) हे त्यांचे माहेर. त्या शेडगे कुटुंबातील. त्यांचे आरंभीचे शिक्षक पुण्यात चुलत्यांकडे झाले. त्यानंतर त्यांचे वास्तव्य भरतगावातच होते. त्यांचे वडील बबनराव अन्‌ चुलते सुभाषराव हे सामाजिक कार्यकर्ते. सुभाषराव हे खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्ती. पोगरवाडी येथील दुसरे राजकीय कार्यकर्ते मधुकर घोरपडे यांचे चिरंजीव संतोष यांच्याशी स्वाती यांचा विवाह झाला. स्वाती यांचा जीवन प्रवास त्यांच्या वडिलांनी ‘सकाळ’शी बोलताना उलगडला. ‘स्वातीच्या कामगिरीचा विलक्षण अभिमान वाटतो. बालपणापासून ती निर्भीड, धाडसी अन्‌ जिद्दी स्वभावाची होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे तिला विद्यानिकेतनमध्ये प्रवेश मिळाला. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. ती मुळातच आत्मनिर्भर होती. मुलांचे क्‍लासेस घेऊन तिने स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. बंगळूरमध्ये ती ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिथेही ती स्वस्थ बसली नाही. ‘केंब्रिज’ विद्यापीठाचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला होता. या प्रत्येक वेळी तिच्या जिद्दीची प्रचिती येत होती.’ त्यामुळेच संतोष यांच्या पश्‍चात लष्करी सेवेत दाखल होण्याचा मनोदय व्यक्त केल्यानंतर तो पूर्ण करणार, ही आम्हा कुटुंबीयांना पूर्ण खात्री होती, असेही श्री. शेडगे यांनी नमूद केले. 

‘तिचे स्वप्न हे तिच्या जगण्याचे निमित्त ठरले. तिच्या आयुष्यात काळोख होता. मात्र, तिने जिद्दीने प्रकाशाची वाट शोधली.’
-बबनराव शेडगे, (भरतगाव, ता. सातारा) लेफ्टनंट स्वाती यांचे वडील

Web Title: satara news Swati Mahadik