नोंदणीकृत दस्त आता तलाठ्यांकडे 

विशाल पाटील
मंगळवार, 31 जुलै 2018

सातारा - जमीन, जागा, घर खरेदी केल्यानंतर नोंदणीसाठी आता तहसील कार्यालय व तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्याची गरज नाही. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी कार्यालयामार्फत थेट तलाठ्यांच्या ऑनलाइन डेस्कला दस्ताची माहिती व संबंधित कागदपत्रे पाठविण्यात येणार आहेत. त्यावर तलाठ्यांनी 15 दिवसांत फेरफार अर्थात खरेदी केलेल्या व्यक्‍तीच्या नावाची नोंद करावी लागणार आहे. 

राष्ट्रीय भूमिअभिलेख कार्यालयातील राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. जमीन, जागा अथवा घर खरेदी केल्यानंतर नावाची नोंद करणे जिकिरीचे ठरत आहे. त्यासाठी तलाठी, मंडलाधिकारी यांच्याकडे संबंधितांना हेलपाटे घालावे लागत होते. शासनाने 2013 मध्ये प्रत्येक तहसील कार्यालयात फेरफार कक्ष सुरू केला होता. या फेरफार कक्षाकडे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून कागदपत्रे पाठविली जात होती. त्यावर संबंधित तहसीदारांच्या डेस्कवरून नोंदणीकृत दस्त तलाठ्याकडे नोंदीसाठी पाठविला जात होता. ही प्रक्रिया नुकतीच बंद केली आहे. त्यामुळे संबंधित खरेदीदारांच्या वेळेची बचत होणार आहे. शिवाय, तहसीलदारांवरील कामाचा ताणही कमी होईल. 

...असा आहे आदेश 
ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातून प्राप्त होणाऱ्या नोंदणीकृत दस्तांची माहितीवर प्रक्रिया करून फेरफार तयार करण्यासाठी व फेरफाराची नोटीस (नमुना 9) तयार करून संबंधितांना बजावण्याच्या उद्देशाने तहसीलदार कार्यालयात फेरफार कक्ष तयार केला होता. त्यामध्ये बदल करून हा टप्पा कमी करण्यात आला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाकडून प्राप्त नोंदणीकृत दस्तांची माहिती संबंधित तलाठ्याच्या लॉगीनला थेट प्राप्त होईल. त्यावर संबंधित तलाठ्याला योग्य ती कार्यवाही करून फेरफार घेण्याची प्रक्रिया करावी लागेल. 

तलाठ्यांना 15 दिवसांची डेडलाइन 
तलाठ्यांनी 15 दिवसांत संबंधित खरेदी केलेल्या व्यक्‍तीचे नाव उताऱ्यावर लावणे बंधनकारक आहे. तांत्रिक अडचण नसताना 15 दिवसांच्या मुदतीत नोंद न केल्यास वरिष्ठ अधिकारी संबंधित तलाठ्यावर कारवाई करू शकतात. मुदतीत नोंदी न केलेल्या प्रलंबित नोंदीची माहिती तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिसणार आहे, अशी माहिती महसूल विभागातून देण्यात आली.

Web Title: satara news Tahsil office now for registration