शिक्षकांना "झेडपी'त नो एंट्री! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सातारा - शाळा सोडून वैयक्तिक कामानिमित्त जिल्हा परिषदेत येऊन चमकोगिरी करणाऱ्या प्राथमिक शिक्षक व शिक्षक नेत्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी आचारसंहिता घालून दिली आहे. यापुढे वैयक्तिक कामासाठी जिल्हा परिषदेत येण्यापूर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विनापरवानगी शिक्षक अथवा शिक्षक संघटनेचा नेता जिल्हा परिषदेच्या आवारात दिसल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. 

सातारा - शाळा सोडून वैयक्तिक कामानिमित्त जिल्हा परिषदेत येऊन चमकोगिरी करणाऱ्या प्राथमिक शिक्षक व शिक्षक नेत्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी आचारसंहिता घालून दिली आहे. यापुढे वैयक्तिक कामासाठी जिल्हा परिषदेत येण्यापूर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विनापरवानगी शिक्षक अथवा शिक्षक संघटनेचा नेता जिल्हा परिषदेच्या आवारात दिसल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. 

काही प्राथमिक शिक्षक शाळेवर कमी आणि जिल्हा परिषदेत जास्त अशी परिस्थिती झाल्यामुळे त्या त्या शिक्षकांच्या शाळांतील गैरहजेरीमुळे शैक्षणिक अध्यापनाच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. यातूनच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. मुळात प्राथमिक शिक्षकांसह काही शिक्षक नेते जिल्हा परिषदेत पडून असतात. त्यांचे त्यांना नेमून दिलेल्या शाळेकडे दुर्लक्षच असल्याचे दिसून येते. काही प्राथमिक शिक्षक वैयक्तिक कामानिमित्त जिल्हा परिषदेत येतात आणि काम झाले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वावरत असतात. या सर्व प्रकारांवर निर्बंध आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी शिक्षक व शिक्षक संघटनेच्या नेत्यांसाठी आचारसंहिता लागू केली आहे. यापुढे कोणताही शिक्षक व शिक्षक संघटनेचा नेता जिल्हा परिषदेत शासकीय किंवा वैयक्तिक कामानिमित्त येणार असेल, तर त्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी काढावी लागणार आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता शिक्षक संवर्गातील कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आवारात आढळून आल्यास त्यावर प्रथम निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खाते प्रमुखांच्या बैठकीत याबाबत सक्त सूचना केल्या आहेत. उपशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, तसेच शिक्षक संवर्गातील कर्मचारी यांनी त्यांच्या वैयक्तिक कामाबाबत प्रथम विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर पाठपुरावा करावा. त्यांच्याकडून अपेक्षित काम झाले नाही, तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावयाचा आहे. तालुकास्तरावर वरील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही काम झाले नाही, तर वरील सर्व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यांसह शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे संपर्क साधायचा आहे, तसेच शिक्षणाधिकाऱ्यांकडून संबंधित शिक्षकाचे अपेक्षित काम झाले नाही अथवा शंका निरसन झाले नाही तरच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे. त्यामुळे थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्याचे प्रकारही बंद होणार आहेत. 

शिक्षक संघटनांचे पदाधिकारी अथवा प्रतिनिधी यांनीही वरिष्ठ अधिकारी यांना भेटण्यापूर्वी त्यांची पूर्वपरवानगी घ्यावी, तसेच त्यांनी दिलेल्या वेळेतच त्यांची भेट घेऊन संघटनेच्या कामाबाबत चर्चा करावी. याबाबतच्या लेखी सूचना गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

शिक्षक संघटना काय भूमिका घेणार?  
दरम्यान, या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत कामानिमित्त येऊन दिवसभर चमकोगिरी करणाऱ्या व शाळेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना चाप बसणार आहे; पण शिक्षक संघटना आता या नव्या आचारसंहितेबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: satara news teacher zp