सातारकर  म्हणतात,किती  दिवस  पोसायचे टोल भैरव

सातारकर  म्हणतात,किती  दिवस  पोसायचे टोल भैरव

सातारा - खासदार व आमदार गटातील धुमश्‍चक्रीवर सातारकरांतून उलट- सुलट प्रतिक्रिया उमटल्या. जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. टोलनाका नको म्हणून समस्त कोल्हापूरकर एकत्र येत असताना साताऱ्याच्या टोलनाक्‍याचे चोचले आम्ही किती दिवस पुरवायचे? किती दिवस त्यावर टोलभैरव पोसायचे? असा प्रश्‍न येथील लोकप्रतिनिधींना पडत नाही. टोलनाका कोणाकडे असावा, यापेक्षा आम्ही सातारकरांनी टोल किती वर्षे भरायचा, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

गेल्या आठवड्यात साताऱ्यात, शुक्रवार पेठेत घडलेल्या धुमश्‍चक्रीनंतर अनेक साताराकरांना हा प्रश्‍न पडला आहे, की मुळात टोलनाक्‍याची गरज आहे का? टोलनाकेच राहिले नाही, तर तो कोणाकडे द्यायचा हा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही. ज्याला इंग्रजीत ‘बंपर टू बंपर’ म्हणतात अशा पद्धतीचा वाहतुकीचा भार सातारा-पुणे रस्त्यावर नाही. साधारण २००१ मध्ये या रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरवात झाली. ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर २०१० पर्यंत त्याची मुदत होती. ही मुदत संपते तोच सहापदरी रस्त्याचे कंत्राट देण्यात आले. त्यानंतर तब्बल सात वर्षे सातारकर पुण्याकडे जाताना दोन ठिकाणी टोल भरत आहेत. 

देशात मोठे नाव असलेल्यांपैकी एक ‘रिलायन्स’कडे हे काम आहे. मुळातच चौपदरी असलेला रस्ता आता त्यांना सहापदरी म्हणजे दोन पदर वाढवायचे आहेत. त्यासाठी सात वर्षांचा काळ गेला. लोकांना शेकडो ठिकाणी ‘डायव्हर्शन’ घ्यावे लागत आहेत. जागोजागी असलेले खड्डे, जीवघेणी वळणे यामुळे लोकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पुलांची कामे अजून अर्धवट आहेत. नोंदीत- विनानोंदीत शेकडो अपघातांत प्रवासी जायबंदी होत आहेत. भुईंजजवळ सुरू असलेला पूल ढासळतो, यावरून चाललेल्या कामाच्या दर्जाचा अंदाज येतो. 

ही सर्व परिस्थिती डोळ्यांनी दिसत असताना टोल का आणि किती दिवस भरावा, असा प्रश्‍न सर्वसामान्यांपुढे आहे. सात- सात वर्षे उलटूनही सहापदरीकरण पूर्ण होत नसेल, तर त्याचा भुर्दंड प्रवाशांनी का सोसायचा? ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या 

तत्त्वाचा अर्थ याठिकाणी उलटा घेण्यात आला. आधी बांधायचे, नंतर टोल वसूल करत त्याचा वापर करायचा आणि भांडवल वसुलीनंतर सरकारला हस्तांतरित करायचा असा त्याचा स्पष्ट अर्थ असताना येथे उलटे चित्र दिसते. आधी ते वापरतात, म्हणजे ताबा घेतल्या दिवसापासून टोलवसुली सुरू होते. नंतर वर्षांनुवर्षे ते बांधत बसतात आणि हस्तांतर कधी करणार याबाबत ना सरकार तोंड उघडते ना टोलनाका व्यवस्थापन काही जाहीर करते! 

उकळाउकळीचा धंदा
सहापदरीकरणाचा खर्च किती, टोलवसुली किती वर्षे चालणार, किती वेळा त्याला टोल वसुलीसाठी मुदतवाढ देणार या बद्दल कोणतीही परदर्शकता टोलनाक्‍यावर पाहायला मिळत नाही. टोलनाका म्हणजे सरळसरळ उकळाउकळीचा धंदा झाला आहे. ते काही समाजसेवेचे साधन नाही, हे लोकांना स्पष्ट झाले आहे. या टोलनाक्‍यावर पोसून मोठे झालेले अनेक टोलभैरव जनतेने पाहिले. महामार्गाला लागून औद्योगिक वसाहत असूनही या ठिकाणी मोठे उद्योग आले नाहीत. साताऱ्याचा व्यापार- उदीम अपेक्षीत वेगाने वाढला नाही. त्यामुळे येथील तरुण घोळक्‍या घोळक्‍याने सोमवारी सकाळी पुण्या- मुंबईकडे पळतो आणि शुक्रवारी साताऱ्याला परत येतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुन्हा तोच जाता- येता हा टोल भरत असतो. 

सर्वसामान्यांना  पडलेले काही प्रश्‍न
 २०२० च्या ट्राफीक इंडेक्‍सवर चौपदरीकरण झाले; मग मध्येच सहापदरीकरणाचा घाट कोणासाठी?
काम पूर्ण होण्याआधीच टोल कशासाठी? आणखी किती वर्षे टोल भरायचा?
जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने कधीच यातील कोणताही प्रश्‍न उपस्थित केला नाही
२०११ पासून टोलच्या रूपाने किती पैसे जनतेने भरले हे जाहीर व्हावे
 सहापदरीकरणाचे सात वर्षे सुरू असलेले काम कधी पूर्ण होणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com