सातारा ‘उपप्रादेशिक’कार्यालय उभारणार ट्रॅफिक पार्क

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

सातारा - रस्त्यावरून चालताना आदर्श नागरिकाचे वर्तन कशा पद्धतीचे असले पाहिजे, याबाबत सध्याच्या प्रचलित अभ्यासक्रमात कुठेच शिक्षण दिले जात नाही. वाहतुकीशी संबंधित महत्त्वाची प्राथमिक चिन्हे, त्यांचे अर्थ, धोक्‍याची ठिकाणे, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकासह प्रबोधन झाल्यास ते अधिक परिणामकारक होईल. हा मुद्दा लक्षात घेऊन पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर साताऱ्यात ‘ट्रॅफिक पार्क’ उभारण्याचा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा मनोदय आहे. 

येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे व सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग हे त्यासाठी प्रयत्नशील आहेत. चर्चेदरम्यान त्यांनीच ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘आपण वाहनचालक असो वा पादचारी सार्वजनिक रस्त्यावर आपले वर्तन आदर्श असले पाहिजे. तरच संभाव्य अपघात व त्यामध्ये होणारे नुकसान टाळता येईल. त्याकरिता वाहतूक नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी, अपघातग्रस्तांना मदत कशी करावी, छोटे- छोटे नियम पाळून अपघात कसे टाळू शकतो, याचे सविस्तर प्रशिक्षण शालेय जीवनापासूनच प्रत्येकाला मिळणे गरजेचे आहे. नियम पाळण्यापेक्षा सोईनुसार ते तोडण्यावरच प्रत्येकाचा भर असतो. नकळत तेच संस्कार आपण पाल्यावर करत असतो. पुढे जाऊन तेच चित्र कायम राहू नये. विद्यार्थ्यांसह नागरिकांना या ठिकाणी आल्यानंतर चिन्हे, माहिती फलक, चित्रे आदींच्या माध्यमातून वाहतूक नियमनाची माहिती व्हावी, हा या पार्कमागील उद्देश आहे.’’

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात हा पार्क उभारण्याचे नियोजन आहे. जेणेकरून ड्रायव्हिंग टेस्टसाठी आलेल्या चालकांनादेखील त्याचा फायदा होईल. हे पार्क साकारण्यासाठी आर्किटेक्‍टने नुकतीच ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकची पाहणी केली. या पार्कमध्ये आणखी काय काय असावे, याबाबत विचारविनिमय सुरू असून ते आकर्षक आणि मुलांना आवडेल अशा पद्धतीने करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे श्री. बाग यांनी नमूद केले.

Web Title: satara news Traffic Park to set up Satara Sub-Regional office