तेच- तेच "डायलॉग' लोकांच्या सवयीचे! 

सोमवार, 25 जून 2018

सातारा - लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांप्रमाणेच पक्ष व पक्षांतर्गत विरोधकांवर दबाव टाकण्याची भूमिका खासदार उदयनराजे भोसले आता वठवू लागले आहेत. कालचा फलटणचा अंक त्याचाच एक भाग. मात्र, या वेळी परिस्थिती बदलली आहे. तेच-तेच "डायलॉग' लोकांच्या सवयीचे झाले, तर त्यांच्या या भूमिकांना "जशास तसे' उत्तर देण्याची तयारीही झाली आहे. 

सातारा - लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांप्रमाणेच पक्ष व पक्षांतर्गत विरोधकांवर दबाव टाकण्याची भूमिका खासदार उदयनराजे भोसले आता वठवू लागले आहेत. कालचा फलटणचा अंक त्याचाच एक भाग. मात्र, या वेळी परिस्थिती बदलली आहे. तेच-तेच "डायलॉग' लोकांच्या सवयीचे झाले, तर त्यांच्या या भूमिकांना "जशास तसे' उत्तर देण्याची तयारीही झाली आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी काल फलटणमध्ये जाऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना थेट आव्हान दिले. या वेळी भाषेची पातळी घसरली. उदयनराजे बोलले, की त्याची नागरिकांबरोबरच राजकीय वर्तुळात चर्चा होतेच. उदयनराजेंनी असे बोलायला नको किंवा उदयनराजे असेच बोलतात, असे त्या वक्तव्यावर नागरिकांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. हे सर्व आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झाले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. राष्ट्रवादीची जिल्ह्यातील नेते मंडळी आणि उदयनराजे यांचे तसे फारसे कधी जमले नाहीच. जिल्ह्याच्या राजकारणात खासदारकी व्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये उदयनराजेंचा "शेअर' कधी मान्य झाला नाही. त्यामुळेच जिल्हा परिषद व असो वा जिल्हा बॅंक, उदयनराजेंना राष्ट्रवादीविरुद्धच दंड थोपटावे लागले. तो धागा पकडत त्यांच्या खासदारकीला आव्हान देण्याचे प्रयत्न मागील लोकसभा निवडणुकीतही झाले. मात्र, मनोमिलनाच्या कारभारात त्याला तितकासा जोर चढला नाही. त्यानंतरही उदयनराजेंच्या राष्ट्रवादीशी असलेल्या वर्तनात फरक पडला नाही. त्यामुळे पक्षाचे स्थानिक नेते व त्यांच्यातील दरी दिवसेंदिवस रुंदावत गेली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत उदयनराजेंनी घेतलेल्या पक्ष विरोधी भूमिकेसारखी अनेक उदाहरणे त्यासाठी स्थानिक नेत्यांकडे आहेत. ती नाकारताही येत नाहीत. 

स्थानिक नेत्यांच्या या असंतोषाला उदयनराजेंनी नेहमी आक्रमकतेने निरुत्तर केले आहे. भूमाता दिंडी असो किंवा बारामतीकडून होणारा जिल्ह्यावरील अन्याय असो या भूमिकांच्या आक्रमक मांडणीमुळे राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यात ते दोन्ही वेळेला यशस्वी झाले. आताही ते तेच करू पाहात आहेत. मात्र, या वेळी परिस्थिती वेगळी आहे. आजवर बोलून गुळगुळीत झालेल्या गोष्टीच ते पुन्हा उगाळू लागले आहेत. बारामतीचा अन्याय, जिल्हा विभाजनाचा डाव, जिल्ह्यातील पाणी पळवल्याचा आरोप, अजितदादांचा भ्रष्टाचार या सर्व गोष्टी सातारकरांना सवयीच्या झाल्या आहेत. त्या सोयीच्या आहेत, असेही लोकांना वाटेल. आक्रामकपणा म्हणायचा तर उदयनराजेंना त्यांच्याच भाषेत प्रतिउत्तर करण्याची तयारीही राष्ट्रवादीतून झालेली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी उघडपणे ती भूमिका घेतली आहे. त्याचे परिणाम सुरुची राड्याच्या प्रकरणाच्या निमित्ताने काही प्रमाणात उदयनराजेंनीही अनुभवले आहेत. त्यांची कमजोरी व बलस्थानेही जोखली गेली आहेत. त्यामुळे टोकाच्या भूमिकेमुळे त्यांचे इप्सित साध्य होईल, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. आम्ही त्या मूडमध्ये नाही असे सांगत त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर सामूहिक बहिष्कार टाकून सर्व आमदारांनी दाखवून दिले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांची अद्याप तरी आमदारांच्या भूमिकेला सहमती दिसत नाही. मात्र, कालच्या सारखे प्रकार वाढले, तर विरोधालाही तेवढीच धार येऊ शकते. रणसंग्रामाला सामोर जायचे, की किल्ला अलगद आपल्या गोटात आणायचा याचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे राजकीय पटलावरील चालींबाबत उदयनराजेंनी गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक बनले आहे.

Web Title: satara news Udayan Raje Bhosle politics