उदयनराजेंच्या धमाकेदार एन्ट्रीनंतर साताऱ्यात "आया है राजा'चा घुमला नाद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

सातारा - तब्बल तीन महिन्यांची सातारकरांची प्रतीक्षा आज रात्री संपली. धमाकेदार एन्ट्री, तोच सळसळता उत्साह पाहून बेधुंद झालेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी साताऱ्याच्या रस्त्यावर आज "आया है राजा'चा नाद घुमला. तब्बल एक तास खासदार उदयनराजेंना पाहण्यासाठी थांबल्यामुळे राजपथ ठप्प झाला होता. 

सातारा - तब्बल तीन महिन्यांची सातारकरांची प्रतीक्षा आज रात्री संपली. धमाकेदार एन्ट्री, तोच सळसळता उत्साह पाहून बेधुंद झालेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी साताऱ्याच्या रस्त्यावर आज "आया है राजा'चा नाद घुमला. तब्बल एक तास खासदार उदयनराजेंना पाहण्यासाठी थांबल्यामुळे राजपथ ठप्प झाला होता. 

खंडणीसाठी लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलायन्स या कंपनीच्या मालकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खासदार उदयनराजे भोसले व अन्य साथीदारांवर शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सुमारे तीन महिन्यांपासून सातारकरांना उदयनराजेंचे दर्शन झाले नव्हते. तीन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर मात्र, सातारकरांमध्ये उदयनराजे कधी येणार या चर्चेला उधाण आले होते. 

सर्वांच्या उत्सुकतेला आज पूर्णविराम मिळाला. रात्री नऊच्या सुमारास उदयनराजे अनपेक्षितपणे साताऱ्यात अवतरले. सोबत गाड्यांचा ताफा होता. हा हा म्हणता ही बातमी साताऱ्याच्या गल्लीबोळात पसरली. प्रत्येक जण उदयनराजेंचा ठिकाणा शोधून तेथे पोचत होता. थोड्याच वेळात हजारो युवकांची गर्दी उदयनराजेंच्या भोवती गोळा झाली. सदरबझारमध्ये गाडीतून उतरल्यावर तर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. "आया है राजा,' "वाघ है वाघ है, उदयनराजे वाघ है,' "कोण म्हणतंय येत नाय,' अशा घोषणांनी शहर दुमदुम लागले. थोड्याच वेळात जिल्हाभरात ही बातमी पोचली. अनेकांचे फोन माहिती घेण्यासाठी खणखणू लागले. सदरबझारमध्ये पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानासमोरून उदयनराजे नागरिकांच्या भेटी- गाठी घेत राजपथावर आले. उदयनराजेंना दारात पाहून नागरिकांना उचंबळून येत होते. कोण पाया पडतेय, कोण मिठी मारतेय, कोणाला काय बोलावे हेच सूचत नव्हते. प्रत्येक जण घराच्या बाहेर येऊन भेटीला आलेल्या नेत्याला पाहून गहिवर आलेला दिसत होता. कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजीही केली. शाहू चौक, शाही मशीद, टॅक्‍सी गल्ली, मोती चौक परिसरात नागरिकांच्या भेटी उदयनराजेंनी घेतल्या.

Web Title: satara news Udayanraje Bhosale