बिले आली, पण पाण्याचा नाही पत्ता!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

प्रतापगंज पेठेतील अशा नागरिकांची बिले सुटीत टाकण्याबाबत लवकरच स्थायी समिती निर्णय घेईल. नागरिकांना त्याची तोशिश लागू देणार नाही. असा प्रकार आणखी कोठे झाला असल्यास संबंधितांना तातडीने पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा.’’
- श्रीकांत आंबेकर, सभापती, पाणीपुरवठा विभाग, सातारा 

सातारा - सात वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या सातारा सुधारित पाणी वितरण योजनेच्या पाण्याचा अद्याप शहराच्या काही भागात पत्ता नाही. आणखी किती वर्षे लागतील, याचे भाकीत खुद्द पालिकेला करता येत नाही. मात्र, संबंधित नागरिकांना पालिकेने कर आकारणीत पाणीपट्टीचीही आकारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

लहान व मध्यम शहरांच्या मूलभूत सुविधांचा विकास (यूआयडीएसएसएमटी) योजनेंतर्गत सातारा शहरात सुधारित पाणी वितरण व्यवस्थेची कामे सुरू आहेत. ‘सुरू आहेत’ म्हणजे योजनेची कामे पूर्ण झालेली नाहीत, म्हणून ती सुरू आहेत. शहराच्या सुमारे ८० टक्के भागात जलवाहिनीवरून नागरिकांना निळ्या पाइपची कनेक्‍शन देण्यात आली आहेत. ही कनेक्‍शन घेऊन तीन वर्षे झाली तरी अद्याप चाचण्याच सुरू आहेत. विशेषत: प्रतापगंज पेठ व बुधवार पेठेच्या काही भागातील नागरिक निळ्या पाइपच्या पाण्याची वाट पाहात आहेत. नव्याने झालेल्या काही निवासी संकुलांमधील नागरिक नवीन नळ कनेक्‍शन घेण्यासाठी गेले होते.

त्यांना जुन्याऐवजी नव्या निळ्या पाइपचे कनेक्‍शन देण्यात आले. ‘जुने घेऊ नका काही दिवसांतच ते बंद करण्यात येईल, दोन-दोन कनेक्‍शनचा खर्च करण्यापेक्षा थोडे दिवस थांबा,’ असा सल्ला त्यावेळी देण्यात आला. त्यामुळे बऱ्याच नागरिकांनी जुन्या वितरण व्यवस्थेवरून कनेक्‍शन न घेता नव्या निळ्या पाइपचे कनेक्‍शन घेतले. या गोष्टीला तीन वर्षे झाली. खर्चासाठी बोअरचे पाणी उपलब्ध असले तरी नागरिक आजही पिण्यासाठी शेजारच्या नळावरून पाण्याचे चार हंडे मिळविण्याकरिता धावपळ करत आहेत.  

नागरिकांना आता मिळालेल्या मागणी बिलात पाणीपट्टीची रक्कम नमूद केल्याने नागरिकांमध्ये तळपायाची आग मस्तकात गेली आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात काही भागात अद्याप निळ्या पाइपचे पाणी मिळालेले नाही. अशा परिस्थितीत पालिका प्रशासन पाण्याची बिले पाठवून नागरिकांच्या भावनांशी खेळत आहे, अशा प्रतिक्रिया संतप्त नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

Web Title: satara news water bill